मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर नव्या बंबार्डियर लोकल महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्याकडून नाकारण्यात येत आहेत. मात्र मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या या भूमिकेला मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनीच विरोध केला असून मध्य रेल्वे प्रवाशांच्या वाट्याला जुन्या लोकल का, असा सवालच अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयुटीपी-२ अंतर्गत ७२ नव्या बंबार्डियर लोकल आणल्या जाणार असून यातील तीन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ऊर्वरीत गाड्या २0१६ मध्ये दाखल होतील. याआधी ४२ लोकल मध्य रेल्वे मार्गावर तर ३0 लोकल पश्चिम रेल्वेच्या वाट्याला देण्याची योजना रेल्वेकडून आखण्यात आली. मात्र काही महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त असतानाच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्याचवेळी मध्य रेल्वे मार्गावर डीसी-एसी परावर्तनही पूर्ण करण्यात आले होते आणि हे परावर्तन पूर्ण झाल्यावर काही दिवस तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वे हैराण झाली. हे पाहता नविन बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेच्या वाट्याला नको, असा पवित्रा घेत या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरच चालवण्याची भूमिका महाव्यवस्थापक सूद यांनी घेतली. त्याऐवजी पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्याची मागणी त्यांनी रेल्वे बॉर्डाकडे केली. मात्र पश्चिम रेल्वेवर येणारी एसी लोकल आणि नव्या मिळणाऱ्या बंबार्डियर लोकल पाहता मध्य रेल्वेच्या वाट्याला काहीच मिळाले नसल्याचे समोर आले. याला प्रवासी संघटनांकडून विरोध करण्यात आला. मात्र सूद यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. आता मात्र सूद यांच्या भूमिकेला काही मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनीही विरोध केला आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या सिमेन्स लोकल यात सात ते आठ वर्ष जुन्या असून त्यांचे आयुर्मान लवकरच संपणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर आल्यानंतरही बिघाड कमी होतील, असा महाव्यवस्थापकांचा दावा फोल ठरणारा असल्याचे अधिकारी सांगतात. मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी किती वर्ष जुन्या गाड्या वाट्याला सहन करायचा ही विचार करणारी गोष्ट आहे. त्यामुळे बंबार्डियर पश्चिम रेल्वेवरच चालवण्याचा सूद यांचा आगळावेगळा हट्ट का असा प्रश्न मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनाच पडला आहे. (प्रतिनिधी)
बंबार्डियरवरून ‘मरे’त मतभेद
By admin | Published: August 18, 2015 3:12 AM