‘परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा’
By admin | Published: February 21, 2016 02:18 AM2016-02-21T02:18:24+5:302016-02-21T02:18:24+5:30
महापालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक नामवंत व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ घडलेले आहेत. अशी ही गौरवशाली परंपरा लक्षात घेता, दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे
मुंबई : महापालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक नामवंत व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ घडलेले आहेत. अशी ही गौरवशाली परंपरा लक्षात घेता, दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. महापालिका शालेय विद्यार्थ्यांशी ‘व्हर्च्युअल क्लासरूम’द्वारे सुसंवाद साधताना महापौर बोलत होत्या.
महापालिका शिक्षण विभागाच्या दादर येथील कार्यालयात महापौरांनी वरळीतल्या जे.के. मार्ग येथील महापालिका शाळा, बोरीवली, अंधेरी, कांदरपाडा, चेंबूर स्थानक, गोवंडी, गोशाळा इंग्रजी माध्यमिक या महापालिका शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांशी ‘व्हर्च्युअल क्लासरूम’द्वारे सुसंवाद साधला. या वेळी त्या म्हणाल्या की, शालेय शिक्षण घेत असताना शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ही शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची असते. या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर परिश्रम घेतात. याकरिता विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकही खूप मेहनत घेतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जात भरारी घ्यावी. आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षेत व्यवस्थित मांडणी करावी. परीक्षेसाठी जाताना अत्यावश्यक सर्व वस्तू बरोबर ठेवाव्यात. परीक्षेसाठी आलेले मूळ ‘हॉल तिकीट’ जवळ बाळगून त्याची एक छायांकित प्रत दक्षता म्हणून घरी ठेवावी. १ ते २२ मार्च या कालावधीत महापालिकेतील १० हजार ७९२ विद्यार्थी शालान्त प्रमाणपत्र परीक्षेला सामोरे जाणार आहेत. यात ५ हजार ६०० मुली तर ५ हजार १९२ मुलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)