Join us

चुकीच्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहायची कशी?, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:21 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ५ मार्च रोजी झालेल्या दहावीच्या मराठीच्या पेपरमध्ये मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहिण्यासंदर्भात प्रश्न होता.

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ५ मार्च रोजी झालेल्या दहावीच्या मराठीच्या पेपरमध्ये मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहिण्यासंदर्भात प्रश्न होता. परंतु, छपाईच्या चुकीमुळे तो प्रश्न विद्यार्थ्यांना समजला नाही. त्यामुळे अनेकांनी तो प्रश्नच टाळला. त्यामुळे गुण कमी होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. प्रत्यक्षात या प्रश्नात छपाईची चूक असल्याचे उघडकीस आले आहे.५ मार्चच्या सीबीएसई बोर्डाच्या मराठीच्या पेपरमध्ये छपाईच्या चुकीमुळे मुद्द्यांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजणे कठीण गेले. पर्यवेक्षकांना विचारणा केली असता काही चुकीचे असल्यास मंडळाकडून सूचना येतील, त्यासनुसार विद्यार्थ्यांना निर्देश देऊ, असे सांगण्यात आले. पनवेलमधील एका शाळेतील पालकांनी या प्रकाराची तक्रारही मुख्याध्यापकांकडे आणि शाळा प्रशासनाकडे केली. यासंदर्भात लेखी निवेदनही शाळेला दिले. मात्र त्यांनी तक्रार मंडळाकडे करावी अशा सूचना केल्या. त्यानुसार सीबीएसई बोर्डाकडे तक्रार करण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याची माहिती संजय घंगोडे या पालकांनी दिली.