लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. त्यामध्ये एक-एक घटकाची वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही. राज्य आणि रेल्वेच्या पवित्र्यामुळे संभ्रम असून आजच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून लोकल सुरू होतील. मात्र प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो त्याचाही विचार व्हावा, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
सध्या ९० टक्के फेऱ्या सुरू आहेत. उर्वरित १० टक्के फेऱ्या सुरू करण्याची आमची तयारी आहे. सर्व रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना पाठविला जाईल, ते गृहमंत्रालयाला पाठवतील. त्यानंतर पुढील आदेश येतील तेव्हा लोकल सुरू होईल.- वरिष्ठ अधिकारी, पश्चिम रेल्वे