- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासकमला माझ्या लहानपणची गोष्ट आठवते. मी लहान असताना वडिलांना मी प्रश्न विचारला होता. ‘बाबा, गणपतीची सोंड नेहमी डावीकडे वळलेली का असते, उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का?’ बाबा मला म्हणाले, ‘तूच विचार करून उत्तर शोधून काढ.’ मी गणपतीची मूर्ती नीट निरखून पाहिली. तेव्हा माझ्या लक्षात आले की, गणपतीच्या डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो. म्हणून गणपतीची सोंड डावीकडे झुकलेली असते. मी माझे उत्तर बाबांना सांगितले. त्यांनी त्याबद्दल मला दिलेली शाबासकी अजूनही मला आठवते. मग बाबा म्हणाले, ‘गणपतीची सोंड जरी उजवीकडे वळलेली असली, तरी तो गणपती कडक नसतो. देव हा कधीच कडक नसतो. तो नेहमी कृपाळूच असतो. तो नेहमी अपराधाना क्षमा करीत असतो. म्हणून ईश्वराची पूजा ही प्रेमाने, श्रद्धेने व भक्तीने करावयाची असते.’बरेच लोक असाही प्रश्न विचारतात की, ‘पूर्वी आमच्या घराण्यामध्ये दीड दिवस गणपती आणीत होतो, आता पाच दिवस गणेशोत्सव करावयाचा आहे तर चालेल का?’ ‘हो चालेल, शास्त्रात असे कुठेही लिहिलेले नाही की, अमुक दिवस गणेशपूजन करा म्हणून!’ आपण कितीही दिवस ठेवू शकतो. फक्त करीत असलेला बदल आपल्या आप्तेष्ट मित्रांना कळविला गेला पाहिजे. म्हणजे त्यांची गैरसोय होणार नाही, तसेच अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष सुरू होतो. (याच वर्षी पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आहे.) म्हणून जास्तीत जास्त अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन केले जाते.काही लोक घरात गरोदर महिला असेल, तर गणेश विसर्जन करीत नाहीत. विसर्जन केले, तर जन्मणाºया बाळाला त्रास होईल, असे त्यांना वाटते, परंतु तसे काहीही होणार नसते. गणेशमूर्तीचे परंपरेप्रमाणे ठरलेल्या दिवशी विसर्जन केले, तरी गणेशाची कृपा होतच असते. इथे एक गोष्ट समजून घ्यावी की, आपण गणेशाचे विसर्जन करीत नसतो, मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणतो आणि उत्तरपूजा करून ते देवत्व काढून घेतो. नंतर आपण मूर्तीचेच विसर्जन करीत असतो. गणेश देवाचे नाही. गणेश चतुर्थीच्या दिवसात जर सोयर- सुतक आले, तर गणेशमूर्ती आणून पूजन केले जात नाही. आणि सोयर - सुतक संपल्यावर, इतर दिवशी मग गणेशमूर्ती आणून पूजन करू नये. जर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना झाल्यानंतर, जर सोयर - सुतक आले, तर लगेच दुसºयाकरवी उत्तरपूजा करून, मूर्तीचे विसर्जन करावयाचे असते.काही लोक या वर्षी आणलेली गणेशमूर्ती विसर्जन न करता, वर्षभर घरात ठेवतात आणि मागच्या वर्षी आणलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करतात, परंतु असे करणे योग्य नाही. कारण गणेशमूर्ती मातीची असते. तिला वातावरणात व तापमानात होणाºया बदलामुळे इजा होण्याची शक्यता असते. काही कलावंत गणेशमूर्तीमध्ये लाइट बल्ब बसवितात, हेही करणे योग्य नाही. श्रीगणपती नवसाला पावतो का? असा प्रश्न काही लोक विचारतात. मी आस्तिक असूनही त्यांना नम्रपणे सांगतो की, श्रीगणेश हा नवसाला कधीही पावत नसतो. तसे जर असते, तर नवस बोलून भारताची गरिबी दूर करता आली असती. नवस बोलून भ्रष्टाचार संपविता आला असता. नवस बोलून गुन्हेगार पकडता आले असते. नवस बोलून आतंकवाद्यांना मारता आले असते. नवस बोलून परीक्षेत चांगले गुण मिळवता आले असते, नवस बोलून दुष्काळी भागांत पाऊस पाडता आला असता. नवस बोलून देशापुढचे आणि आपल्या पुढचे सर्व प्रश्न सोडविता आले असते. आणि हो, नवस बोलून या गोष्टी होत नाहीत. म्हणूनच जगण्यात आनंद आहे आणि यशासाठी प्रयत्न करण्यातच खरे जीवन आहे. जीवनात मिळालेल्या गोष्टींपेक्षा प्रयत्न करून मिळविलेल्या गोष्टी जास्त आनंद प्राप्त करून देत असतात.
देव कधीच कडक नसतो : श्री गणेशपूजेविषयी समज-गैरसमज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:08 AM