Join us

आरटीई सोडतीबाबत संभ्रम; संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे आज जाहीर होणार लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 1:15 AM

यंदा राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १ लाख १५ हजार ५५३ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ९१ हजार ८४६ अर्ज म्हणजे दुप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुंबई : राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी ४ मार्चपर्यंत पालकांना मुदतवाढ देण्यात आली होती.

त्यानंतर ११ आणि १२ मार्च रोजी संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे या प्रक्रियेची सोडत घेण्यात येणार होती. मात्र आरटीईच्या संकेतस्थळावर सोडतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असा संदेश दिसत असल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे. या प्रवेशाची केवळ एकच सोडत घेण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यंदा घेतला आहे. त्यानंतर शाळांतील उपलब्ध जागांची सोडत काढून तेवढ्याच जागांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.

यंदा राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी १ लाख १५ हजार ५५३ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ९१ हजार ८४६ अर्ज म्हणजे दुप्पट अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल म्हणून एकच सोडत काढण्यात येईल. त्यानुसार शाळेत आरटीईअंतर्गत उपलब्ध जागांएवढीच प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. सोडत लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात येईल. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मेसेज एनआयसीद्वारा पाठविण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा लागेल. यानंतरही शाळेत जागा रिक्त रहिल्यास दुसºया प्रतीक्षा यादीतील अनुक्रमाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तिसºया आणि चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनाही असेच प्रवेश देण्यात येतील. यासंदर्भात आरटीई अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :शिक्षण हक्क कायदा