मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम; पालिका प्रशासनाकडून अद्याप निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:49 AM2021-02-12T03:49:23+5:302021-02-12T07:21:54+5:30
महापालिका प्रशासनाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोमवारपासून राज्याप्रमाणे मुंबईतील महाविद्यालयेही सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर मुंबई व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. मुंबईतही १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा होती. तशी तयारीदेखील महाविद्यालय स्तरावर सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेने याबाबत निर्णय घेणे अपेक्षित असते. महापालिकेने अद्याप याबाबत परिपत्रक काढलेले नाही. याबाबत आयुक्तांना विचारले असता, १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.