लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी रुग्णालयांत दोन पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यास पालिका प्रशासनाने संमती दर्शविली असली तरीही मनुष्यबळाची उपलब्धता, लसींचा पुरवठा, शीतसाखळ्यांची सक्षमता आणि त्या जिल्ह्यांमधील संसर्गाचे प्रमाण याचा अभ्यास केल्यानंतर दोन पाळ्यांमध्ये लसीकरणाच्या सुविधेला चालना देण्यात येणार आहे. यामुळे दोन पाळ्यांमध्ये लसीकरणासाठी खासगी रुग्णालय व्यवस्थापन संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईमध्ये आता १२ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. हे लसीकरण सशुल्क असले, तरीही काही रुग्णालयांना वॉक इन पद्धतीने लसीकरण करण्यास संमती दर्शविलेली नाही. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, लसीकरण दोन्ही वेळेस सुरू ठेवल्यास जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस घेता येईल, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही रात्रीचे लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यास इच्छुक खासगी रुग्णालयांची माहिती पालिकेला मिळालेली नाही.
याविषयी, असोसिएशन ऑफ हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले, पालिकेची दररोजच्या लाख लाभार्थ्यांची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही, दिवसभरात अजूनही ५० हजारांच्या खाली लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण प्रक्रियेला वेग आल्यानंतर खासगी रुग्णालयांना दोन पाळ्यांचा विचार करण्यात येईल. तोवर लसीकरणासाठी आवश्यक निकषपूर्ती न झाल्यामुळे दोन पाळ्यांमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झालेली नाही.