मुंबई : अपुऱ्या जलसाठ्यामुळे महापालिकेची सर्व उद्याने व बंगल्यांमधील झाडे आणि हिरवाई जगविण्यासाठी आवश्यकतेनुसार कमी पाणी वापरण्याचे आदेश प्रशासनाने एकीकडे दिले आहेत़ त्याच वेळी प्रक्रिया केलेले तीन ते चार दशलक्ष लीटर पाणी मात्र, दररोज समुद्रात सोडून देण्यात येत आहे़ त्यामुळे पाणीबचतीच्या पालिकेच्या या अजब कारभाराने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत़अपुऱ्या पावसामुळे पालिकेने गेल्या आॅगस्ट महिन्यापासून पाणीपुरवठ्यात १५ टक्के, तर पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० टक्के कपात केली आहे़ मात्र, दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने पालिकेने आता बचतीचे नवीन मार्ग अवलंबिले आहेत़ यापैकीच एक म्हणजे, उद्यानांमधील व पालिकेच्या बंगल्यांमधील उद्यानांतील झाडांसाठी कमी पाणी वापरणे असा आहे़उद्यानांमध्ये पाण्याची नासाडी केल्यास, त्या उद्यानाची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने परिपत्रकातून दिले आहेत़, तर या उद्यानांसाठी वापरणे शक्य असलेले प्रक्रिया केलेले तीन ते चार दशलक्ष लीटर पाणी समुद्रात सोडून देण्यात येत आहे़ त्यामुळे पाणीबचतीबाबत पालिकेच्या इच्छाशक्तीवरच संशय व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
पालिकेच्या पाणीबचत मोहिमेबाबतच संभ्रम
By admin | Published: April 19, 2016 2:48 AM