हॉटेलमध्ये प्रवाशांचा ठिय्या; माहिती न मिळाल्याची नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, याबाबत विमानात बसण्यापूर्वी अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर क्वारंटाइन होण्यास आक्षेप घेतला. यापैकी अन्य राज्यांतील प्रवाशांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केली, तर मंगळवार दुपारपर्यंत हॉटेल परिसरात ठिय्या मांडून काही प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबई विमानतळावर सोमवार रात्रीपासून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पोलीस आणि पालिका अधिकारी तैनात होते. नवी मुंबई, मुंबई, ठाणे असे सहा बुथ स्थापन करण्यात आले होते, परंतु विमानतळ परिसरात योग्य मार्गदर्शन करण्यात आले नाही, अशी नाराजी काही प्रवाशांनी व्यक्त केली, तर पैशांअभावी काही प्रवाशांना त्यांच्या पसंतीचे हॉटेल निवडण्याची मुभा हवी होती.
परंतु विमानतळावरून बसद्वारे पालिकेने निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये प्रवाशांना नेण्यात आले. दरम्यान, अन्य राज्यांतील प्रवाशांनी आपल्या राज्यात पाठविण्याची विनंती केल्यामुळे २३६ प्रवाशांना सोडण्यात आले. मात्र, काही प्रवाशांना क्वारंटाइन न करता सोडल्याचे पाहून अन्य प्रवाशांनी हॉटेल परिसरात ठिय्या मांडला. यामुळे हॉटेल परिसरात तणाव वाढला होता.
* अखेर रूमवर परतलाे
पालिका अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित होते. त्यात काही प्रवाशांना क्वारंटाइन न करता सोडले, यामुळे गोंधळ वाढला. दिल्लीप्रमाणे मुंबईतही प्रवाशांची चाचणी करून पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाइन करावे, एवढीच आमची मागणी होती. यासाठी हॉटेल परिसरात काही प्रवाशांनी ठिय्या आंदाेलन केले. मात्र, दुपारपर्यंत पालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर आम्ही आमच्या रूमवर परतलो.
- निशित महाजन (ब्रिटनवरून सोमवारी रात्री आलेला प्रवासी)
..............................
* पाच दिवसांनी करणार चाचणी
सात दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार, हे प्रथमतः कोणाला पटणार नाही. मात्र, पहिला दिवस असल्याने थोडा गोंधळ झाला असावा. क्वारंटाइन करण्यात आलेल्या प्रवाशांची पाच दिवसांनी कोरोना चाचणी करण्यात येईल.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)