मुंबई: दहावीच्या परीक्षेपेक्षा इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा नापास होण्याचा टक्का अधिक असल्याने निकालाचा टक्का वाढवण्यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या. मात्र, फेरपरीक्षा जून महिन्यात घेण्याचे शिक्षण विभागाने सांगितल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर बसू शकतो. त्यामुळे शाळा परीक्षा कधी घ्यायची याविषयी संभ्रमावस्थेत असून काही शाळांनी फेरपरीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के अथवा चांगला लागावा यासाठी अनेक शाळा नववीचा निकाल अधिक कडक पद्धतीने लावतात. त्यामुळे नापास होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक शाळांचा नववीचा निकाल हा ३० ते ५० टक्क्यांवर आला आहे. निकालाचा घसरत्या टक्क्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत. याविरुद्ध विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. या विषयाची गंभीर दखल घेत नववी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय १६ सप्टेंबर २०१६ रोजी शिक्षण विभागाने जाहीर केला होता. अद्याप याविषयी ही फेरपरीक्षा शाळेत घेण्यात आलेली नाही. जूनमध्ये फेरपरीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश घेणे कठीण होईल. त्यामुळे अनेक शिक्षकांनी जूनमध्ये परीक्षा घेण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. पण, अजूनही याविषयी स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे राज्यातील शाळा संभ्रमावस्थेत आहेत. तर, काही शाळांनी ही फेरपरीक्षा एप्रिल महिन्यातच घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दहावीची प्रवेशप्रक्रिया सुरळीत होईल असे शिक्षकांचे मत आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा जून महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे निर्णयानुसार जून महिन्यांतच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परिपत्रकानुसार, जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्यासाठी शाळांनी तयारी सुरु केल्याची माहिती राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नववी फेरपरीक्षेविषयी शाळांमध्ये संभ्रम
By admin | Published: April 10, 2017 6:36 AM