वेळापत्रक अद्याप जाहीर नसल्याने अस्वस्थता, मात्र वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याची सीईटी सेलची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षण विभागाकडून बारावी बोर्डाच्या परीक्षेचे नियोजन जाहीर झाले, मात्र त्यानंतर पुढे काय? त्यानंतर देण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक अद्याप सीईटी सेलकडून जाहीर करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा याची दिशा व मार्गदर्शन मिळत असते. मात्र अद्याप सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. सीईटी सेलने संपूर्ण नियोजन जाहीर न करता किमान तारखा तरी जाहीर कराव्यात, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले.
महाराष्ट्रात अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, बी फार्मसी, आर्किटेक्चर, लाॅ, एमएड, बीपीएड यासह जवळपास १८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी तब्बल ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती. इतर परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या. अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपली. मात्र, लाॅची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया संपल्यावरच पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
* नियाेजित प्रवेेश प्रक्रिया संपल्यावर वेळापत्रक हाेणार जाहीर
काेरोना प्रादुर्भावाचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. प्रवेश प्रक्रिया लांबली. मात्र आता विधी आणि कृषीच्या प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. नियोजित प्रवेश प्रक्रिया संपल्यावर नवीन एजन्सी नियुक्त करण्यात येईल. ही प्रक्रिया संपल्यावर पुढील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
- चिंतामणी जोशी, आयुक्त, सीईटी सेल
* ...तर पुढील तयारी करणे साेपे
मला अभियांत्रिकीच्या नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यादृष्टीने बारावी आणि सोबतच सीईटीची तयारी केली आहे. पण परीक्षा कधी होणार याची स्पष्टता आली असती तर पुढील तयारी आणखी सोपी झाली असती.
- प्रतीक्षा बुगडे, विद्यार्थिनी, बारावी