मुंबई विमानतळावर गोंधळ, हाताने लिहिले बोर्डिंग पास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:32 AM2022-12-02T06:32:45+5:302022-12-02T06:33:05+5:30
केबल तुटले, संगणक बंद, प्रवाशांच्या रांगा, विमाने दोन तास लटकली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान विमानतळावरील संगणकांना इंटरनेट सेवा देणारी डेटा केबल तुटल्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील संगणक गुरुवारी सुमारे दोन तास बंद पडले. त्यामुळे टी-२ टर्मिनलवर निव्वळ गोंधळाची स्थिती होती.
संगणकच बंद पडल्यामुळे मुंबईबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंग पास मिळू शकला नाही. तसेच त्यांचे सामानही विमानापर्यंत पोहोचू शकले नाही. परिणामी शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांची गर्दी वाढू लागल्यानंतर काही विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना हस्तलिखित बोर्डिंग पास देण्यास सुरुवात केली. दरम्यान, सांयकाळी ६.३५ च्या दरम्यान बिघाड दुरुस्त झाला असून सेवा पूर्ववत झाल्याची प्रतिक्रिया मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि.च्या प्रवक्त्यांनी दिली. दिल्लीनंतर देशात मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त असणारे विमानतळ आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सायंकाळी ४.३० च्या दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोर्डिंग पास जारी करणारे आणि चेक इन करणारे सर्व संगणक अचानक बंद पडले. सुरुवातीला कारण न समजल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
इंटरनेट केबल तुटल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली. मात्र, बोर्डिंग आणि चेक-इन या दोन्ही सुविधा ठप्प झाल्यामुळे प्रवासी अडकले आणि परिणामी त्यांना ज्या विमानांनी प्रवास करायचा होता त्यांचा प्रवासही जवळपास दीड ते दोन तास विलंबाने सुरू झाला.
तांत्रिक समस्या उद्भवल्यानंतर पुढील विलंब टाळण्यासाठी विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना हस्तलिखित बोर्डिंग पास देण्यास सुरुवात केली. यामुळे मोठी रांग लागली होती.