गोंधळात गोंधळ : ...तर रेल्वे स्थानकांवरच कोरोना पसरणार नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:21+5:302020-11-28T04:05:21+5:30
गोंधळात गोंधळ : रेल्वे स्थानकांवरच तर कोरोना पसरणार नाही ना? लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दिवाळीनंतर येणारी कोरोनाची लाट ...
गोंधळात गोंधळ : रेल्वे स्थानकांवरच तर कोरोना पसरणार नाही ना?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीनंतर येणारी कोरोनाची लाट थोपविण्यासाठी मुंबई महापालिकेने आता परराज्यातून रेल्वेमार्गे मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी सुरू केली असली तरी या चाचणीदरम्यानच एखाद्या प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग होईल की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. शिवाय कोरोना चाचणीबाबत अद्यापही रेल्वे प्रवाशांना पुरेशी माहिती नाही. ज्या ज्या रेल्वे स्थानकांवर कोरोनाची चाचणी केली जात आहे, तेथे तैनात कर्मचारी, पोलिसांसह अन्य कर्मचाऱ्यांनादेखील नक्की कुठे कोरोना चाचणी होत आहे, याबाबत पुरेशी कल्पना नाही. कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी पावले उचलली जात असतानाच दुसरीकडे मात्र अशा गोंधळात भर पडत असलेल्या वातावरणाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती अधिकच वाढली आहे.
मुंबई महापालिकेकडून आजघडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरीवली येथे दाखल रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने यापैकी लोकमान्य टिळक टर्मिनस येथील आढावा घेतला. येथील गेट क्रमांक एकवर रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात असल्याचे येथे तैनात सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात आले. मुळात टर्मिनसमध्ये कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. प्रवेशद्वारावरच चौकशी केली जात होती. विनाकारण आत गेलात तर दंड भरावा लागेल, असेही तैनात सुरक्षारक्षकांकडून बजाविले जात होते. मात्र येथे उपस्थित प्रवासी सुरक्षारक्षकांनादेखील जुमानत नव्हते आणि स्थानकात प्रवेश करत होते. सामाजिक अंतराच्या नियमांचे तर येथे केव्हाचेच तीनतेरा वाजले होते. स्थानकात असलेले आणि स्थानकाबाहेर असलेल्या प्रवाशांनी मास्क तोंडाला लावण्याबाबत हलगर्जीपणा बाळगला होता. टर्मिनसच्या परिसरात थोड्याफार फरकाने हेच चित्र होते. येथील फेरीवाले, रिक्षावाले आणि दाखल प्रवाशांच्या गावी जणू काही कोरोना नव्हताच, अशी स्थिती होती. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महापालिका उपस्थित नसल्याचे चित्र होते.
------------
बुधवारचे रेल्वे प्रवासी : ९ हजार ७७९
गुरुवारचे रेल्वे प्रवासी : १३ हजार २५३
------------
गेट क्रमांक १ वर जा...
रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी गेट क्रमांक १ वर सुरू आहे, असे तैनात कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात आत प्रवेश नसल्याने नक्की कुठे चाचणी सुरू आहे, याबाबत पुरेशी माहिती मिळाली नाही. परिणामी येथे तैनात पोलिसांनादेखील याबाबत माहिती विचारण्यात आली. मात्र त्यांनीही हातवारे करत गेट क्रमांक १ वर चाचणी सुरू असल्याचे सांगितले.
------------
प्रवासात कोरोना झाला तर...
परराज्यातून प्रवासी रेल्वेतून मुंबईत दाखल होत आहेत. एवढा प्रवास करताना एखाद्या प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग असेल आणि त्याद्वारे इतर प्रवाशांना प्रवासात कोरोनाची लागण झाली तर, या प्रश्नाचे उत्तर कोणत्याच प्रशासनाकडे नाही. दुर्दैव म्हणजे रेल्वे प्रवासीदेखील याबाबत पुरेसे जागरूक नाहीत. सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजले आहेत. मास्कबाबत रेल्वे प्रवासी सजग असले तरी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी एवढे पुरेसे नसल्याचे चित्र आहे.
------------
१० रेल्वे प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह
बुधवारपासून रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी ९ हजार ७७९ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी १० रेल्वे प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सर्वाधिक रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. हा आकडा ३ हजार ४०० आहे. तरी सर्वात कमी रेल्वे प्रवाशांची चाचणी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे करण्यात आली. हा आकडा ३१५ एवढा आहे. बुधवारी वांद्रे टर्मिनस येथे ५ रेल्वे प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
------------
३ रेल्वे प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह
गुरुवारीदेखील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. गुरुवारी एकूण १३ हजार २५३ रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ३ रेल्वे प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी बोरीवली रेल्वे स्थानकावर सर्वाधिक रेल्वे प्रवाशांची चाचणी करण्यात आली. हा आकडा ३ हजार ८२१ आहे, तर दादर येथील चाचणीत २ रेल्वे प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.