पोलिसांना धक्काबुकी, पोलिसांनी ठोकल्या बेडया
विनामास्क फिरणाऱ्या मद्यपींंचा गोंधळ
धक्काबुकी; ॲन्टाॅप हिल पोलिसांकडून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मद्यधुंद अवस्थेत विनामास्क फिरणाऱ्या दुकलीने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार रविवारी ॲन्टाॅप हिल परिसरात समोर आला. याप्रकरणी ॲन्टाॅप हिल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलीस शिपाई प्रवीण बाबुराव गजरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबी कॅम्प परिसरात काहीजण दारुच्या नशेत धिंगाणा घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार, गजरे आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. तेव्हा दोघेजण दारूच्या नशेत मोठमोठ्याने शिवीगाळ करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना गोंधळ का करत आहात, अशी विचारणा करताच त्यांनी पोलिसांसोबत उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. त्यांना संचारबंदीच्या नियमांची आठवण करून देताच, त्यांनी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली.
पाेलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. तेथेही त्यांचा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी त्यांना अटक केली. रजत अमृत बत्रा (३४) आणि पवन भजनलाल गुजराल (३६) अशी त्यांची नावे असून, दोघेही खासगी कंपनीत नोकरीला आहेत. हे दोघेही पंजाबी कॅम्प परिसरातच राहणारे आहेत.
त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे तसेच महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध कलम - २, ३ सह महाराष्ट्र शासन कोविड - १९ उपाययोजना २०२०चे कलम ११सह ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार ॲन्टाॅप हिल पोलीस अधिक तपास करत आहेत.
.............................