अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण २४ जुलैला होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारच्या आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या समाजमाध्यमावरील खात्यावरून करण्यात आली. मात्र काही वेळातच एक्स खात्यावरील ट्विट काढून टाकण्याची त्यांच्यावर नामुष्की ओढवली. त्यातून २४ जुलैला उद्घाटन होणार ही पोकळ घोषणा असल्याचे स्पष्ट झाले.
मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा मार्ग पहिल्या टप्प्यात सुरु केला जाणार आहे. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयारी सुरू असून नुकतीच आरडीएसओ पथकाकडून या मार्गावर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आता येत्या काही दिवसात सीएमआरएस पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान अद्याप सीएमआरएस पथकाकडून या मेट्रो मार्गिकेची तपासणी होऊन प्रमाणित करण्यात आले नसताना त्या पूर्वीच २४ जुलैला मेट्रो मार्ग सुरू होणार आहे, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सुरक्षा तपासणीविना मेट्रो गाडी कशी धावू शकणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. तसेच मेट्रो मार्ग नक्की कधी सुरु होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच याबाबत एमएमआरसीकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया देण्यात आली नाही. त्यातून या गोंधळात आणखी भर पडली.
दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि केंद्र सरकारच्या माय गव्हरमेंट इंडिया या समाजमाध्यमातील खात्यावरून बुधवारी सायंकाळच्या सुमारास मेट्रो ३ मार्गिका सुरु होण्याबाबतच्या पोस्ट काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर चर्चांना पुर्णविराम मिळाला. दरम्यान सद्यस्थितीत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी मेट्रो ३ मार्गिकेचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र सीएमआरएस पथकाकडून तपासणी करून हिरवा कंदील दाखविण्यात आल्यानंतरच मेट्रो मार्गिका सुरु होऊ शकणार आहे. त्यामुळे एमएमआरसीला पुढील दीड महिन्यात ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.