अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ अजूनही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:50 AM2019-10-16T06:50:01+5:302019-10-16T06:50:25+5:30
उपसंचालक कार्यालयाबाहेर प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची गर्दी; नियोजनाचा अभाव असल्याचा पालकांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई : अकरावीची पहिली सत्र परीक्षा सुरू झाली, तरी अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी १५ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत उपसंचालक कार्यालयात येऊन प्रवेश निश्चित करण्याची संधी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिली. त्यानुसार, प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी चर्नी रोड येथील उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती. मात्र, येथे नियोजनाच्या अभावामुळे तासन्तास रांगेत उभे राहून नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचा नाराजीचा सूर विद्यार्थी, पालकांमध्ये आहे.
अकरावी प्रवेशाच्या सात फेऱ्यांनंतरही अद्याप प्रवेश न मिळालेल्या, अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी (अर्ज भरताना झालेल्या तांत्रिक चुका, काही वैयक्तिक समस्या, एटीकेटी अशा विविध कारणांमुळे प्रवेश घेऊ न शकलेले विद्याथी) ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना १७ आॅक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत कागदपत्रांसह चर्नी रोडच्या कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.
प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरीप्रमाणेच विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयांत रिक्त जागा असल्यास प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, मंगळवारी प्रक्रिया सुरू झाल्यावर १०० हून अधिक विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी उपसंचालक कार्यालयाबाहेर झाली. त्यामुळे प्रवेशासाठी एकच गोंधळ उडाला. प्रवेश नियंत्रण समितीमधील अधिकाऱ्यांना या गर्दीला आवरणे अशक्य झाल्याने ते हतबल झालेले दिसले. अखेर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाला टोकन देण्यात आले आणि त्यानुसार प्रवेशासाठी रांगा लावण्यात आल्या. दुपारनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी येण्यास सांगण्यात आले. प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जही भरले नव्हते. त्यांना नवीन प्रवेश पुस्तिका देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रवेशासाठी होणारी विद्यार्थी, पालकांची गर्दी पाहता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी यंत्रणा आणि अधिकारी वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
वैयक्तिक अडचणींमुळे प्रवेश रखडला
कुटुंबातील काही वैयक्तिक अडचणींमुळे प्रवेश परीक्षेदरम्यान आम्ही गावी गेलो होतो. त्यामुळे मला अकरावीसाठी अद्याप प्रवेश घेता आला नव्हता. मागच्याच आठवड्यात आम्ही मुंबईत परत आलो. मात्र, आता प्रवेश प्रक्रिया संपल्याचे सांगण्यात आले. प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा आहे. - रिद्धी भोसले, अंधेरी.
निकाल उशिरा लागल्याचा फटका
मी दहावीत एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याने पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता, परंतु त्याचा निकाल वेळेवर लागला नाही. त्यामुळे मला अकरावीसाठीच्या मूळ प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते. - प्रथमेश पवार, मुलुंड.
सर्वांना प्रवेश मिळणार
प्रवेशोच्छुक सर्व विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने सर्वांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.
- राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, मुंबइ विभाग.