मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांसोबत राज्यपाल विद्यासागर राव यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुधारण्यासाठी कायम कुलगुरू तातडीने नेमावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी अनेक वेळा केली होती. यासाठी त्यांनी राज्यपालांकडे पाठपुरावाही केला होता. याच पार्श्वभूमीवर डॉ. सुहास पेडणेकर यांची निवड केल्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात युवासेनेने अनेक वेळा आंदोलनेही केली. डॉ. पेडणेकर यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याने आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठाला कुलगुरू मिळाल्यामुळे परीक्षा विभागासह अनेक टप्प्यांवर सुरू असणारा गोंधळ थांबेल, अशी अपेक्षाही आदित्य यांनी व्यक्त केली. जशी कुलगुरूंची नियुक्ती झाली तशीच प्र-कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणीही त्यांनी केल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी या वेळी दिली. या नियुक्त्यांमुळे विद्यापीठाच्या उपकेंद्रांचा गोंधळही संपेल, अशी आशा असल्याचे आदित्य यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करताना राज्यपालांनी युवासेना व सिनेट सदस्यांकडून ही मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंच्या चांगल्या कामांच्या पाठीशी नेहमी युवासेना असेलच, मात्र विद्यापीठाच्या कारभारावरही आमची नजर असेल, अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.
परीक्षेतील गोंधळ नव्या कुलगुरूंमुळे संपावा, आदित्य ठाकरे यांची राज्यपालांकडे अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 7:04 AM