परीक्षांचा गोंधळ; विद्यार्थी अद्याप गोंधळलेल्या अवस्थेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:56 AM2020-07-02T03:56:21+5:302020-07-02T03:56:36+5:30
राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या व्यावसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांनीही त्यासाठी मंजुरी देण्यास सांगावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
मुंबई - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा, विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नववीपर्यंतच्या आणि अकरावीच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि सरासरी गुणांच्या आधारे निकाल लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीतही सरासरी गुणांचा निर्णय लागू करण्यात आला.
महाविद्यालयीन परीक्षांच्या बाबतीत पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीतही मागील सत्राच्या गुणांच्या आधारे निकाल देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आला. विद्यापीठांचे कुलपती यांच्याकडून अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला सुरुवातीला झालेला विरोध, विरोधी पक्षांची परीक्षा व्हावी ही ठाम भूमिका या साºया गुºहाळ व राजकारणानंतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षांचा पर्याय देऊन काहीच दिवसांपूर्वी विषय मार्गी लावण्यात आला.
1) अव्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही हाच निकष लावण्यात आला असला तरी त्या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाहीत, हा प्रश्न अधांतरीच आहे.
2)राज्य सरकारकडून अंतिम वर्षाच्या व्यावसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांनीही त्यासाठी मंजुरी देण्यास सांगावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. त्यामुळे हा निर्णय ही लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने हे विद्यार्थी अद्याप गोंधळलेल्या अवस्थेतच आहेत.