दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबईतील दोन जागांवरून पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. मात्र, या दोन जागांवर उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न काँग्रेससमोर आहे. त्यातच मुंबई उत्तरमधून आमदार अस्लम शेख किंवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत.
जागावाटप करताना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याने नाराजी होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस मुंबईत पाच जागा लढवत आली आहे, यावेळी त्यांना तीन जागा हव्या होत्या, मात्र दोनच जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या. त्यातही काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ पदरात पडल्याने मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. या मुद्द्यांवरूनच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.
मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे घेऊन त्याऐवजी मुंबई उत्तर मतदारसंघ उद्धवसेनेला द्यावा, अशी मागणी त्यांनी खरगे यांच्याकडे केली. मात्र, आता या गोष्टीला उशीर झाल्याचे सांगत आलेल्या मतदारसंघात जोमाने निवडणूक लढवा, असा सल्ला खरगेंनी दिल्याचे समजते.