मुंबई - मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या मेगा भरतीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. वेगवेगळे निकष लावून कमी गुण असलेल्या उमेदवारांनाही या यादीत घुसविण्यात आल्याने उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे या यादीला स्थगिती देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारांच्या १,३८८ पदाच्या भरतीसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. तब्बल सहा महिन्यांनी या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची मेरिट लिस्ट नुकतीच प्रशासनाने जाहीर केली. मात्र, या यादीवर उमेदवारांनी आक्षेप नोंदविले आहेत. ही यादी स्थगित करून नवीन यादी जाहीर करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.या परीक्षेला दीड लाख उमेदवार बसले होते. त्यात दोन हजारांपेक्षा अधिक मुलांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मात्र, प्रत्यक्ष यादीत या मुलांना स्थान नसून कमी टक्केवाल्यांना स्थान देण्यात आले असल्याचा आरोप अन्य उमेदवारांनी केला आहे. ही यादी रद्द करून सुधारित यादीत न्याय मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.पालिका ‘आयआयटी’ कंपनी आहे का?एनसीटीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे नाराज अन्य उमेदवारांनी महापालिका ‘आयआयटी’ कंपनी आहे का? असा सवाल केला आहे. महिला आरक्षणाबाबत आॅनलाइन अर्जांमध्ये कोणतीही तरतूद नव्हती, तरीही यादीत नावे आहेत.
कामगार भरतीच्या मेरिट लिस्टमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:00 AM