मुंबई : मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईहून गोव्याला निघणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाने प्रत्यक्ष उड्डाण केले रात्री पावणेअकराला आणि दुपारी १ वाजल्यापासून विमानतळावर आलेले प्रवासी गोव्याच्या मोपा विमानतळावर पोहोचले साडे अकरा वाजता. बाहेर येईपर्यंत १२ वाजलेले तर आपल्या घरी पोहोचायला मध्यरात्रींनंतरचा १ वाजून गेला. त्यामुळे प्रवाशांनी एअरलाईन्सला लाखोळ्या घातल्या. ही एकाच विमानाची स्थिती नव्हती. स्पाईसजेटच्या भावनगर व कोच्ची विमानांचाही गोंधळ होता आणि चेन्नईला दुपारी ४ वाजता निघणारे विमान रात्री ११.३० वाजता सुटेल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे यापुढे ही एअरलाईन्स नको, असे प्रवासी चिडून बोलत होते. स्पाईसजेटच्या विमानसेवेचा सध्या रोज गोंधळ सुरू आहे. बरीच विमाने खूप उशिरा उड्डाण घेतात, अशा असंख्य तक्रारी प्रवासी करीत होते. या गोंधळाचे कारण सांगायला कोणीही वरिष्ठ अधिकारी विमानतळावर उपस्थित नव्हता.
छत्रपती शिवाजी महाराज (सांताक्रूझ) विमानतळवरून गोव्यासाठीचे विमान (क्रमांक ४५५) ३ वाजून ५ मिनिटांनी सुटते. त्यासाठी प्रवासी दोन तास आधी म्हणजे १ वाजता पोहोचले. चेकिंग आदी सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना साडेतीन वाजता विमानात पाठवणे सुरू केले. प्रवासी स्थानापन्न झाले, पण विमान उडण्याचे नाव घेईना. दोन्ही दरवाजे उघडे ठेवल्याने आत प्रचंड उकडत होते. थोड्या वेळाने विमानात बिघाड आहे, अशी घोषणा झाली आणि प्रवाशांना पाणी द्यायला सुरुवात झाली. पावणेपाच वाजता हे विमान उडणारच नाही, असे घोषित केले.
गोंधळात गोंधळ :
सर्व प्रवाशांना उतरवून आगमन कक्षात आणले. तिथे माहिती द्यायला कोणीच नव्हते. तेथून पुन्हा प्रस्थान भागात कसे जायचे, बोर्डिंग पास हाच चालेल की पुन्हा वेगळा घ्यायचा, हे कळत नव्हते. स्पाईसजेटची एक कर्मचारी आली. प्रस्थान भागात जा आणि बोर्डिंग पास बदलून घ्या, असे सांगितले. दुसरे विमान रात्री ९ वाजता सुटेल, तोपर्यंत बसून राहा, बाहेर जायचे असल्यास प्रवास रद्द करा, पैसे परत करू.
विमान दुसऱ्या कंपनीचे :
दुपारी ३ आणि रात्री ९ साठीची दोन्ही विमाने स्पाईसजेटची नव्हती. तुर्कस्तानच्या कंडेरोन एअरलाईन्सची ती होती. स्पाईसजेटने ती बहुदा लीजवर घेतली असावीत. त्यातील परदेशी कर्मचाऱ्यांना हिंदी कळत वा बोलता येत नव्हते. अशा गोंधळाच्या वेळी स्पाईसजेटचे कर्मचारी हात वर करून निघून जातात आणि आम्हाला प्रवाशांच्या शिव्या ऐकाव्या लागतात, असे एका क्रू मेम्बरने सांगितले.
विमानाला विलंब होणार असल्याने खाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही सांगितले. सहा- सात तास खोळंबून असलेल्या प्रवाशांना मग अत्यंत गार जेवण देण्यात आले. रात्री ९ वाजता सुटणारे विमान पावणेदहानंतर नेण्यात आले. पंधरा मिनिटांत विमानं टेक ऑफ करेल, अशी घोषणा पायलटने केली. मात्र, विमानाने उड्डाण केलं पावणे अकरा वाजता.