मुंबईतील शाळा सुरू करण्याच्या कार्यवाहीवरून संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:53+5:302021-01-21T04:07:53+5:30
उपसंचालकांची अखेर पत्रात दुरुस्ती: अंतिम निर्णय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचाच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून ...
उपसंचालकांची अखेर पत्रात दुरुस्ती: अंतिम निर्णय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचाच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, मुंबई महापालिका क्षेत्रात १६ जानेवारीपासून महानगरपालिका आयुक्तांच्या पुढील निर्णयापर्यंत शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाचा असल्यामुळे पालिका आयुक्तांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. दरम्यान, मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
१८ जानेवारी रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील शाळांतील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यात मुंबई, ठाणे वगळून असा कोणताही उल्लेख केलेला नाही. यामुळे शाळांनी २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे केवळ पत्रक काढण्यात आले आहे, मात्र अंतिम निर्णय आयुक्तांचाच असणार असल्याचे स्पष्टीकरण मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांनी दिले. आयुक्तांच्या निर्णयानंतरच मुंबईतील शाळा सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर उपसंचालकांचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हधिकारी व आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणेच शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा आशयाचे दुसरे पत्रक काढावे लागले.
* आपसात समन्वय साधणे गरजेचे
महापालिकेच्या वतीने शासन आदेश असूनही अद्याप शाळांना सॅनिटायझर, आवश्यक सुरक्षा व स्वच्छता सामग्री उपलब्ध झालेली नाही. अशा वेळी शाळा सुरू करण्याची कार्यवाही कशी करावी? असा प्रश्न मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी उपस्थित केला. त्यामुळे आदेश किंवा सूचना देताना मुंबई पालिका शिक्षण विभाग व उपसंचालक यांनी आपसांत समन्वय साधावा, अशी मागणी यानिमित्ताने केली.
......................