मशिदीवरच्या 'भोंग्यां'वरून गोंधळ, पण आमच्या बंद मिलचा 'भोंगा' कधी वाजणार?; २० हजार कामगारांचा सवाल
By महेश गलांडे | Published: April 13, 2022 05:15 PM2022-04-13T17:15:08+5:302022-04-13T17:21:07+5:30
मशिदींवरचा भोंगा उतरवा किंवा मंदिरावर भोंगा लावा, पण आमच्या मिलचा भोंगा कधी सुरू होणार? हे आधी आम्हाला सांगा, असा सवाल हा गिरणी कामगार करत आहे.
महेश गलांडे
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर, अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते नवख्या सुजात आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच चर्चा अन् टीका केली. राज यांच्या भाषणांमुळे मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, देशभरात गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या गिरण्यांच्या भोंग्यावर बोलायला कुणीही तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यावेळी, मुंबईसह महाराष्ट्रातील 5 आणि देशातील एकूण 23 गिरण्या केल्या, त्या आजतागायत बंदच आहेत. मुंबईतील या बंद गिरण्यांच्या भोंग्याकडे ना राज ठाकरेंचे लक्ष्य आहे, ना मुख्यमंत्र्यांचे. या गिरणी कामगारांचा आवाज कोणालाही ऐकू येताना दिसत नाही. म्हणूनच, मशिदींवरचा भोंगा उतरवा किंवा मंदिरावर भोंगा लावा, पण आमच्या मिलचा भोंगा कधी सुरू होणार? हे आधी आम्हाला सांगा, असा सवाल हा गिरणी कामगार करत आहे.
गिरणगाव अशी ओळख असलेल्या मुंबईतील गिरण्या बंद पडल्या, बंद गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागला. भोंग्यांच्या चिमण्या पडल्या अन् तिथं 'कोहिनूर'सारखे उंचच उंच टॉवर उभारले गेले. मुंबईतून गिरणीकामगार नाहीसा झाला अन् कॉर्पोरेट वर्ल्डने बस्तान मांडलं. मात्र, मुंबईतील उरल्या-सुरल्या गिरण्याही आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण, देशात खासगीकरण जोर धरत आहे. मुंबईसह देशातील 23 गिरण्यांचा भोंगा वाजविण्यासाठी सरकार इच्छुक दिसत नाही. विशेष दोन वर्षांपूर्वी असलेले केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री बदलले पण अद्यापही या गिरण्या सुरू झाल्या नाहीत. या गिरण्यांमधील हजारो कामगार, या कामगारांची सकाळ आजही मिलच्या भोंग्याचीच वाट पाहतेय.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत देशात 23 गिरण्या कार्यरत आहेत. या 23 गिरण्यांमध्ये अंदाजे 20 हजार कामगार काम करत आहेत. मात्र, लॉकडाऊनपासून या गिरण्या बंद असल्याने येथील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील 3, अचलपूर येथील 1 आणि बार्शीची 1 अशा एकूण 5 गिरण्या बंद आहेत. या 5 गिरण्यांतील हजारो कामागर सध्या बेरोजगार आहेत, अनेकांनी हमाली, भाजीविक्री, रिक्षा, मजुरी, पानटपरी असे किरकोळ उद्योग सुरू केले आहेत. तर, काही कामगारांचेही या काळात निधनही झाले. मात्र, मिलचा भोंगा वाजणार, या आशेवर उरला-सुरला गिरणी कामगारही संपून जात आहे.
देशातील गिरणी कामगारांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने म्हणजे इंटक संघटनेकडूनही सातत्याने मिल सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारकडून आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडत नाही. इंटकचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोनलही केले, या आंदोलनात देशभरातून 23 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर, जानेवारी महिन्यात कोईम्बतूर येथेही आंदोलन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्राचे खासदार आणि सध्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनाही केवळ आश्वासनच दिले.
सदर आंदोलनात कामगारांविरोधी कायदे तसेच बंद असलेल्या मुंबईतील गिरण्या चालू करण्याबाबत व कामगारांच्या हक्काबाबत मागण्या करण्यात आल्या.
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) March 29, 2022
त्यावेळी माझ्यासह सर्व गिरणी कामगार व सर्व संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
२/२
एकीकडे केंद्र सरकार रोजगार वाढविण्याच्या गप्पा मारत आहे. मात्र, जवळपास 20 हजार कामगारांचा रोजगार असलेल्या एनटीसीच्या मिल्स सुरू करत नाही. या गिरण्यांचे खासगीकरण करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून होत आहे. महाराष्ट्रासह, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमधील एकूण 23 गिरण्या बंद असून महाराष्ट्रतील 5 मिल्सचा समावेश आहे. त्यापैकी, केवळ नवीन युनिट असलेल्या 7 गिरण्या सुरू करण्याचा सरकार मानस असल्याचे समजते. मात्र, देशातील 23 मिल्सच्या गिरणी कामगारांना त्या भोंग्याचाच आवाज ऐकायचा आहे.
महाराष्ट्रातील 5 मिल्स बंद, शेकडो एकर जागेवर डोळा?
मुंबईतील इंडिया युनायटेड नंबर 5 टाटा, सीताराम-पोद्दार, दिग्विजय या तीन तर बार्शी टेक्स्टाईल्स मिल्स आणि अचलपूरमधील फिनले मिल्स या दोन अशा एकूण 5 गिरण्या बंद आहेत. मुंबईतील या गिरण्या मध्यवर्ती जागेत आहेत. त्यामुळे, शेकडो एकरचा परिसर या गिरण्यांनी व्यापला असून मोठी जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. कदाचित या जागांमुळेच गिरण्या सुरू न करण्याचा डाव आखला जातोय की काय, अशी शंकाही उपस्थित होत आहे.
धन्यवाद मा.श्री.@AGSawant जी..!🙏
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) March 31, 2022
आपण मांडलेल्या गिरणी कामगारांच्या जठील व्यथा या अत्यंत महत्वाच्या आहेत व या गिरण्या चालू होण्यासाठी आपण शेवट पर्यंत कामगारांसाठी प्रयत्न करू व संघर्षाने लढू.@ANI@PTI_News@ShivsenaCommspic.twitter.com/fteN4Hr0Nw
अरविंद सावंत यांनी लोकसभेत उचलला प्रश्न
शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी यंदाच्या लोकसभा अधिवेशनात गिरण्या सुरू करण्यासंदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, या गिरण्या सुरू करुन कामगारांच्या पोटापाण्याच प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली होती. तर, यापूर्वी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनीही मिल सुरू करण्यासंदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मिलचा भोंगा वाजलाच पाहिजे - सोनवणे
बार्शी टेक्स्टाईल मिल्स ही ग्रामीण भागातील कामगारांची रोजी रोटी आहे. बार्शीसारख्या तालुक्याचं औद्योगिक वैभव आहे. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून ही मिल बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. केवळ कायम कामगारांना 50 टक्के पगार देण्यात येत आहे. तर, कंत्राटी कामगार मजुरी, रिक्षा, हमाली, वॉचमनकी करुन जगत आहे. आमच्या मिलमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती, आज त्यांच्यावरही हाताला मिळेल ते काम करायची वेळ आलीय. काहीही झालं तरी मिलचा भोंगा वाजला पाहिजे, कामगारांची रोजीरोजी सुरू झाली पाहिजे.
नागनाथ सोणवणे
सरचिटणीस राष्ट्रीय गिरणी कामगार संघ (इंटक), बार्शी
अचलपूरच्या कामगारांनी घेतली पवारांची भेट
एनटीसीची अचलपूर येथील गिरणी सुरू व्हावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरें यांच्यासह येथील गिरणी कामगारांनी माजी मंत्री व खासदार शरद पवार यांची गेल्याच आठवड्यात भेट घेतली. यावेळी, लवकरच पियुष गोयल यांच्यासमवेत चर्चा करुन मिल सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.