पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशावरून संभ्रम कायम; गुणवत्तेवरील प्रवेशासाठी प्राचार्यांचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 09:52 AM2021-06-04T09:52:09+5:302021-06-04T09:52:23+5:30
अकरावी प्रवेशासाठी ज्याप्रमाणे सीईटी आयोजित करण्यात येणार आहे ती पदवी प्रवेशांसाठी घेता येऊ शकते का याची चाचपणीही शिक्षण विभागाकडून करण्यात येऊ शकते, अशी शक्यता असल्याचे शिक्षण मंडळातील काही सूत्रांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षण विभाग व शिक्षण मंडळ आता अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांच्या नववी ते अकरावी या वर्षांच्या गुणांचा, शैक्षणिक कामगिरीचा आधार घेण्याची शक्यता आहे. बारावीनंतर पदवीच्या प्रवेशासाठी सीईटी घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
अकरावी प्रवेशासाठी ज्याप्रमाणे सीईटी आयोजित करण्यात येणार आहे ती पदवी प्रवेशांसाठी घेता येऊ शकते का याची चाचपणीही शिक्षण विभागाकडून करण्यात येऊ शकते, अशी शक्यता असल्याचे शिक्षण मंडळातील काही सूत्रांनी सांगितले आहे.
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटले असे सध्यातरी म्हणता येणार नाही. तेव्हा महाविद्यालयीन प्रवेश कसे होणार? विद्यापीठ यासंदर्भात काय निर्णय घेऊ शकतात? केवळ अंतर्गत गुणांच्या आधारे हे प्रवेश होऊ शकतात? का, की महाविद्यालयीन प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र सीईटी द्यावी लागणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र मागीलवर्षी कोरोनाच्या कारणास्तव अकरावीच्या वर्षाची न झालेली अंतिम परीक्षा तसेच अकरावीचा अभ्यासक्रम, परीक्षा गंभीरपणे न घेणे या विद्यार्थ्यांच्या सवयीचा, दृष्टिकोनाचा त्याच्या यंदाच्या बारावीच्या गुणांकनावर परिणाम होण्याची शक्यताही अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे एकूण बारावी परीक्षा रद्द झाली असली तरी अंतर्गत मूल्यमापनाची पद्धती आणि पारंपरिक, व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांवर होणारा त्याचा परिणाम यांबद्दल पालक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थ्यांत मतमतांतरे आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना सीईटी किंवा इतर प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार असल्या तरी बारावीतील पीसीएम-पीसीबी यातील किमान ५० टक्के गुणांची आवश्यकता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे कशी साधणार हा प्रश्न विद्यार्थी, पालकांपुढे आहे.
विद्यार्थ्यांचे लक्ष फॉर्म्युल्याकडे
पदवी प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर न झाल्यास पदवी प्रवेशांत स्पर्धा वाढून विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.
मूल्यांकनाचा फॉर्म्युला आणि प्रवेशाच्या प्रक्रियेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी आयोजित करण्यात येणार आहे ती पदवी प्रवेशांसाठी घेता येऊ शकते का याची चाचपणीही शिक्षण विभागाकडून करण्यात येऊ शकते.