Join us

प्री आयएएसच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:06 AM

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात औरंगाबादसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती ...

तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात औरंगाबादसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती येथे शनिवारी ऑनलाइन झालेल्या उच्च शिक्षण विभागाच्या भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील (प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर) सामायिक प्रवेशप्रक्रिया परीक्षेत गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला. परीक्षेची लिंक ओपन न होणे, सर्व्हर डाऊन होणे, संपर्कासाठीचे हेल्पलाइन क्रमांक सातत्याने व्यस्त येणे यामुळे विद्यार्थी त्रासले हाेते. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

पदवी, पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. काेराेनाचे सावट सर्वच परीक्षांवर असल्याने आधीच विद्यार्थी तणावात आहेत. त्यातच अशा महत्त्वाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ होत असेल तर सरकार डिजिटल क्रांती घडवणार कशी, असा संतप्त सवाल स्टुडन्ट्स राइट्स असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

या परीक्षेला राज्यातील ६ केंद्रांवर एकूण १९,१२२ विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार होते. दरम्यान, भारतीय प्रशासकीय सेवापूर्व परीक्षेचे टेंडर हे एम्ट्रक्स टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. कंपनीने गैरव्यवहार केल्याचा दावा असोसिएशनने केला. शनिवारची परीक्षा रद्द करावी आणि त्याचे पुनर्नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेकडे केली. यासंदर्भात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेशी संपर्क साधला असता इंटरनेट कनेक्टिव्हिटी व सर्व्हरमुळे तांत्रिक अडचणींना काही ठिकाणी सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी त्या दुरुस्त करून विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन पेपर सबमिट केले, अशी माहिती संचालक खुशपत जैन यांनी दिली.

* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचाच निर्णय घेणार

ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या तेथील आढावा त्या त्या विभागीय अधिकाऱ्यांकडून घेऊन माहिती गोळा केली जात आहे आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांच्या शैक्षणिक हिताचाच निर्णय घेण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी खात्री बाळगावी.

- खुशपत जैन,

संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था