तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीनंतर सुधारित निकाल जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएच. डी. आणि एम. फिल. प्रवेश परीक्षेसाठी घेतलेल्या ऑनलाईन पेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मात्र, यातील विधि विषयातील निकालात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास येताच विद्यापीठाने तत्काळ कार्यवाही करून या अडचणी दुरुस्त करून विद्यार्थ्यांच्या लॉगिनवरून सुधारित निकाल दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाने २५, २६ आणि २७ मार्च २०२१ राेजी विविध ७९ विषयांसाठी ऑनलाईन पेट परीक्षेचे आयोजन केले होते. यामध्ये पीएच.डी साठी प्रविष्ट ७,७०६ विद्यार्थ्यांपैकी ४,३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एम. फिल साठीच्या २२३ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, विधि शाखेच्या निकालात गाेंधळ झाल्याचे समोर आले. विधि अभ्यासक्रमामध्ये पीएच. डी. करणाऱ्या पेट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीमध्ये नव्याने निकालाची प्रत प्रसिद्ध करण्यात आली. यात पहिल्या निकालामध्ये अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या निकालात पात्र ठरवले, तर काही विद्यार्थ्यांना पहिल्या निकालाच्या तुलनेत दुसऱ्या निकालात दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. काही विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले.
पेट परीक्षेदरम्यान सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड आल्याने अनेक विद्यार्थ्यांना लॉगिनमधून बाहेर येऊन पुन्हा परीक्षा देण्यास विद्यापीठाने सांगितले होते. परीक्षा दरम्यानचा हा गोंधळ सुधारण्याऐवजी विद्यापीठाने निकालामध्ये ही गोंधळ घातल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम हाेता. स्टुडंट कौन्सिल आणि विद्यापीठ सिनेट सदस्यांनी ही चूक विद्यापीठाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांना सुधारित निकाल पाठविले.
...................................