Join us

मोहरमच्या सुट्टीबाबत शाळांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:54 AM

शासनाने मोहरम या सणानिमित्त गुरुवारी २० सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली.

मुंबई : शासनाने मोहरम या सणानिमित्त गुरुवारी २० सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली. मात्र, शाळांच्या सुट्टीचा याबाबत गोंधळ उडाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक खासगी शाळांनी गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली तर काही शाळांनी शुक्रवारी ती जाहीर केली आहे. शिक्षण विभागामार्फत यासंदर्भात कोणत्याच सूचना न दिल्याने शाळांनी आपापल्या पातळीवर हा निर्णय घेतल्याचे समजते. पालिकेच्या शाळांना मात्र शुक्रवारी मोहरमची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एकूणच शाळांमध्ये आणि पालकांमध्ये या सुट्टीबाबत संभ्रम दिसून आला.शासनाने मोहरमनिमित्त गुरुवारी सर्वत्र सुट्टी जाहीर केली. मात्र, चंद्र दिसण्यावर या सणाचे महत्त्व अवलंबून आहे. चंद्र गुरुवारी नव्हेतर, शुक्रवारी दिसणार असल्याचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे म्हणणे आहे. याबाबत सुट्टीची तारीख एक दिवस पुढे ढकलावी, असेही निवेदन संघटनेने दिल्याचे समजते. शाळा स्तरावर सुट्टीचा निर्णय घ्यावा, असे शाळांना कळविण्यात आले होते. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी शासकीय सुट्टीलाच अनुमोदन देत सुट्टी जाहीर केली.याउलट चंद्र दर्शन शुक्रवारी होणार असल्याची दखल घेत मुंबई पालिका शिक्षण विभागाने शासकीय सुट्टीत बदल करत सूचना जरी केल्या आहेत. त्यामुळे पालिका शाळांना आज म्हणजे शुक्रवारी सुट्टी असेल. यामुळे पालिका शिक्षण विभाग आणि शिक्षण विभागात समन्वय नसल्याची चर्चा आहे. मोहरमच्या सुट्टीबाबत शिक्षण विभागाने निर्णय घ्यायला हवा होता. तसे झाले असते तर शाळा, पालकांचा गोंधळ उडाला नसता, असे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे राजेश पंड्या यांनी व्यक्त केले.

टॅग्स :शाळा