Join us

राणी बागेतील पहिल्याच महासभेत गोंधळ; भाजपची निदर्शने; अर्ध्यात तासात महापौरांनी गुंडाळली सभा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:53 PM

Mumbai : भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी, निदर्शने यातच महापौर किशोरी पेडणेकर यांनी सभेचे कामकाज रेटले. अखेर अर्ध्या तासांमध्ये कामकाज उरकण्यात आले. 

मुंबई - कोविड प्रतिबंधक नियमानुसार सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयातील सभागृह अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे पालिकेची महासभा भायखळा येथील राणीबागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आली. मात्र पहिल्याच महासभेत भाजपने आक्रमक भूमिका घेत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी, निदर्शने यातच महापौर किशोरी पेडणेकर यांनी सभेचे कामकाज रेटले. अखेर अर्ध्या तासांमध्ये कामकाज उरकण्यात आले. 

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर पालिकेची महासभा प्रत्यक्ष घेण्यास बंद करण्यात आले. त्याऐवजी महासभा ऑनलाईन घेतली जात असली तरी तांत्रिक कारणांमुळे अनेकवेळा नगरसेवकांना ऑनलाईन महासभेत आपले मत मांडण्याची संधी मिळत  नव्हती. त्यामुळे कोविडचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर प्रत्यक्ष बैठक घेण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार अन्य समित्यांच्या बैठका प्रत्यक्ष सुरु करण्यात आल्या. मात्र महासभेत २२७ नगरसेवक, पाच स्वीकृत सदस्य, अधिकारी, चिटणीस विभागाचे कर्मचारी अशी उपस्थितांची मोठी संख्या असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्मण झाला. त्यामुळे राणीबागेतील सभागृहात ही महासभा घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी पहिली बैठक घेण्यात आली. 

राणी बागेतील पेंग्विन कक्षासंदर्भातील कंत्राटकामाच्या प्रस्तावाला स्थायी समिती बैठकीत भाजपच्या विरोधाला न जुमानता मंजुरी देण्यात आली. तसेच, मानखुर्द येथील घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडवरील नवीन उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर न केल्याने या दोन कारणास्तव भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली महासभेत घोषणाबाजी करण्यात आली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', ' जय भवानी, जय शिवाजी', ' वंदे मातरम', 'नहीं चलेगी , नही चलेगी दादागिरी नहि चलेगी', अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिका