मुंबई : गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरील निलंबनाचे स्वागत करतानाच अधिवेशन संपेपर्यंत निलंबन कायम ठेवण्यात यावे. शिवाय या खासदारांचे भत्तेही कापावेत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त पक्षातर्फे राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समता संमेलनाचे आयोजित करण्यात येणार असून, संमेलनाचे उद्घाटक म्हणून भाजापाचे अध्यक्ष अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आल्याचे आठवले म्हणाले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामविलास पासवान, अनंत गीते, थावरचंद गहलोत आदी प्रमुख नेत्यांना बोलावण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. याशिवाय १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथे भीमजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, राज्यात १२५ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. मी व्यस्त असल्याने डॉ़ आंबेडकर जयंतीच्या समितीमध्ये कदाचित समावेश केला गेला नसावा, मात्र मंत्रिमंडळात समावेशासाठी आपण तयार आहोत, असेही ते म्हणाले.काँग्रेसने भगवा दहशतवादाचा अजेंडा रेटल्याने जागतिक स्तरावर भारताची बाजू कमकुवत झाल्याचे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. याबाबत विचारले असता दहशतवादाला धर्म नसतो, त्यामुळे सरकारने संविधानाच्या आधारेच चालायला हवे, असे आठवले म्हणाले. केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने दिल्लीत बंगला स्वीकारला नाही़ त्यानंतर इतरांना बंगले देण्यात आल्याने मला बंगला मिळालेला नाही, आता बंगल्यासाठी पंतप्रधानांना पत्र दिले आहे.
गोंधळ घालणाऱ्यांचे भत्तेही कापा -आठवले
By admin | Published: August 04, 2015 1:34 AM