काँगे्रसच्या दगाबाजीचा वन्समोअर

By admin | Published: September 11, 2014 12:06 AM2014-09-11T00:06:13+5:302014-09-11T00:06:13+5:30

ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता महापौर निवडणुकीला चौघे जण आजारी पडले.

Congers Rug Wendmore | काँगे्रसच्या दगाबाजीचा वन्समोअर

काँगे्रसच्या दगाबाजीचा वन्समोअर

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता महापौर निवडणुकीला चौघे जण आजारी पडले. तिघे उशिरा पोहोचले आणि एकीने शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकून राजीनामा दिला. अशा प्रकारे दगाबाजी करण्याची काँग्रेसच्या नगरसेवकांची ही परंपरा दुसऱ्यांदा सुरू झाल्याने काँग्रेस नेतृत्वावर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
महापौर निवडणुकीला दीपक वेतकर, गुरुप्रीत सिंग, मीनल संख्ये आणि राजा गवारी हे चारही नगरसेवक आजारी असल्याच्या कारणास्तव गैरहजर राहिले. कांचन चिंदरकर यांनी व्हीप झुगारून शिवसेनेला मतदान केल, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, रजिया शेख यांच्यासह तिघे उशिरा पोहोचल्याने त्यांचीही या निवडणुुकीला गैरहजेरी लागली. आघाडीच्या मदतीने स्थायी समितीचे सभापतीपद मिळविणाऱ्या गटनेते सुधाकर चव्हाण यांच्यासह मनसेचे सात नगरसेवक तटस्थ राहिल्याने आघाडीला १७ नगरसेवकांचे ‘बळ’ अपुरे पडले.
मुळात ज्या वेळी रवींद्र फाटक यांनी सात नगरसेवकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, तेव्हा आघाडीचे संख्याबळ ६५ वरून ५८ झाले. काँग्रेसचे संख्याबळ हे १८ वरून ११ झाले. तेव्हा गटनेता निवडीवरच नेते आणि नगरसेवकांमध्ये लवकर एकमत झाले नाही. विक्रांत चव्हाण यांची गटनेतेपदी निवड होईपर्यंत फाटक दाम्पत्याने नगरसेवकपदाचा राजीनामाही दिला होता. आता उरलेले दीपक वेतकर, राजा गवारी यांच्यासह चौघे पुन्हा स्वगृही परततील, अशी अटकळ होती. मात्र, महापौर निवडणुकीपर्यंत तसे काहीच झाले नाही. उलट व्हीप झुगारून चिंदरकर यांनीही दगाबाजी केली. नंतर राजीनामा दिला.
कारण, याआधी २०१२ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीच्या वेळी शकिला कुरेशी यांच्यासह अनिता किणे बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना शोधण्यासाठी गेलेले राजन किणे हेही त्या वेळी गैरहजर राहिल्यामुळे शिवसेनेची सत्ता पालिकेवर आली. अर्थात किणेंना त्याची किंमत मोजावी लागली. किणे दाम्पत्यासह कुरेशी यांचेही नगरसेवकपद रद्द झाले होते. पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले राजन किणे प्रभाग ५९ मधून बिनविरोध निवडून आले. अनिता किणे यांच्या जागी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्याच आयेशा कुरेशी तर शकीला यांच्या जागीही काँग्रेसच्याच रेश्मा पाटील विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही जागा राखण्यात काँग्रेसला यश आले होते.

 

Web Title: Congers Rug Wendmore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.