Join us

पश्चिम रेल्वेवर गर्दी घटणार; ट्रेन वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 11:53 IST

आता ६ नोव्हेंबरपासून सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आल्या असून, खार - गोरेगाव दरम्यान पूर्ण झालेल्या ६ व्या मार्गिकेमुळे गर्दी कमी होणार आहे. 

मुंबई : पश्चिम रेल्वेने खार - गोरेगाव दरम्यानच्या ८.८ किमी लांबीच्या ६ व्या मार्गावरील पायाभूत सुविधांचे काम पूर्ण केले असून, या विभागात ११२ किमी प्रतितास वेगाची चाचणी घेतली आहे. ७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या कामामुळे लोकलच्या वेळेवर परिणाम झाला होता आणि प्रवाशांना मनस्ताप झाला होता. आता ६ नोव्हेंबरपासून सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आल्या असून, खार - गोरेगाव दरम्यान पूर्ण झालेल्या ६ व्या मार्गिकेमुळे गर्दी कमी होणार आहे. शिवाय अधिक ट्रेन धावणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.सुमारे ६०७ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. जवळपास १ हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे.

संपूर्ण कामामध्ये वांद्रे टर्मिनस यार्डला ५ व्या आणि ६ व्या लाईनसाठी स्वतंत्र कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. काम सुरळीत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. या कामात खासगी जमीन तसेच सरकारी जमीन भूसंपादन होते.अडथळे निर्माण करणाऱ्या रेल्वेच्या सध्याच्या इमारती पाडून त्याऐवजी नवीन बांधकामे करण्यात आली. यामध्ये रेल्वे क्वार्टर, सहा नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इमारती, दोन नवीन ट्रॅक्शन सबस्टेशन इमारती, तीन बुकिंग ऑफिसचा समावेश आहे.या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय विभागाची लाईन क्षमता वाढेल आणि गर्दी कमी होण्यास, वक्तशीरपणा सुधारण्यास आणि अधिक रेल्वे सेवा जोडण्यास मदत होईल.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई लोकल