Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसनं अच्छे दिनचे लाडू वाटून नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 8:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येचं निमित्त साधत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपवर जाऊन ग्राहकांना “अच्छे दिन लाडू आणि चॉकलेट” चे वाटप करून मोदींचा वाढदिवस साजरा केला

मुलुंड,दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येचं निमित्त साधत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपवर जाऊन ग्राहकांना “अच्छे दिन लाडू आणि चॉकलेट” चे वाटप करून मोदींचा वाढदिवस साजरा केला. अशा पद्धतीनं भाजपा सरकारनं जनतेवर महागाई, पेट्रोल डिझेलची दरवाढ लादल्याच्याविरोधात उपहासात्मक निषेध नोंदवण्यात आला. 

दुसरीकडे ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईविरोधात आंदोलन केले. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेक-यांनी मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन या सत्ताधा-यांना सद्बुद्धी द्या, अशी विनंती करत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी जितेंद्र आव्हाड असे म्हणाले की, ''या मोर्चाच्या निमित्ताने ही अंगडाई आहे, मोठी लढाई तर पुढे सुरू होणार आहे. ज्या दिवशी भारतातील जनता रस्त्यावर उतरुन आक्रोशाचा आगडोंब उभा करेल; त्या दिवशी या भाजपाला कळेल की भारतीय जनता पेटून उठते तेव्हा केवळ आग पेटते''.''देशात मोठ्या प्रमाणात महागाईचा आगडोंब उसळला आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर मोठया प्रमाणात वाढले आहेत. अन्नधान्य महाग झाले आहेत. अच्छे दिनचे आश्वासन देऊन मोदी यांनी नागरिकांना बुरे दिनच दाखवले आहेत'', असा आरोप करत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने जांभळी नाका ते मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराज पुतळादरम्यान मोर्चा काढला. या मोर्चात बैलगाडी, सायकलस्वार आदी सहभागी झाले होते. यावेळी रिकामे गॅस सिलिंडरसह महिला कार्यकर्त्यांनी जोरदार थाळीनाद केला. जितेंद्र आव्हाड यांनी बैलगाडी हाकून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मंदार किणे यांनी सायकल चालवून मोदी सरकारचा निषेध केला. 

भर पावसात हजारो लोक सहभागी झाले होते. मोर्चेक-यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ''वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु, महँगा तेल'', ''मोदींच्या राज्यात मस्तच विकास झाला'', ''चारचाकांचा प्रवास आठ पायांवर आला'', ''मोदींनी दिली विकासाची हूल'', ''देशातला गॅस गेला आली चूल'', ''महाग झाले  पेट्रोल- डिझेल'',  ''चालवू आता फक्त सायकल''आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी आव्हाड यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, या देशात आता सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. इथे फक्त मरण स्वस्त झाले आहे. पण, हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आलेल्या या सरकारच्या काळात सरणासाठी लागणारी लाकडेही महाग झाली आहेत. काय स्वस्त आहे? भाजी महाग, तेल महाग, धान्य महाग, पेट्रोल महाग जीवन महाग; स्वस्त काहीच नाही. या जुमलेबाज सरकारने लोकांना वेडे केले आहे. पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांमध्येही पन्नास रुपयांच्या आत पेट्रोल मिळत आहे. आपण 80 रुपयांनी पेट्रोल विकत घेतोय. अच्छे दिन- अच्छे दिन असे बोंबलणाऱया या मोदी सरकारला आता सांगावेसे वाटतेय की नको बाबा तुमचे हे अच्छे दिन, आमचे जुनेच दिन आम्हाला द्या आता, असे म्हणायची वेळ आली आहे. भारतीय जनतेवर !