बधाई हो...! आयआयटीचा आभासी सोहळा; तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दिले मेडल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:37 AM2020-08-24T02:37:09+5:302020-08-24T02:37:19+5:30

आयआयटी मुंबईमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी आता केवळ एकच पायरी पूर्ण केली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने तुमच्या करिअरची दिशा ठरवावी.

Congratulations ...! IIT's virtual ceremony; Medals awarded to students using technology | बधाई हो...! आयआयटीचा आभासी सोहळा; तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दिले मेडल्स

बधाई हो...! आयआयटीचा आभासी सोहळा; तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दिले मेडल्स

Next

मुंबई : बधाई हो...! असे म्हणत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित स्टिफन शेवार्झमन यांनी आयआयटीच्या दीक्षान्त समारंभातील सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धतीने अभिनंदन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेचा ५८ वा दीक्षान्त समारंभ आभासी पद्धतीने आॅनलाइन पार पडला. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मेडल्सने प्रमुख पाहुणे, संचालक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्याचे प्रक्षेपण डीडी इंडिया, डीडी सह्याद्री तसेच युट्युब व फेसबुकवरून करण्यात आले. या माध्यमातून अनेक आयआयटीअन्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दीक्षान्त समारंभाच्या सोहळ्यात आभासी पद्धतीने सहभाग नोंदविला.

आयआयटी मुंबईमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी आता केवळ एकच पायरी पूर्ण केली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने तुमच्या करिअरची दिशा ठरवावी. ज्या तंत्रज्ञानाचा फायदा तुमच्या देशातील नागरिकांनाच नव्हे तर जगभरातील लोकांना होईल, असे तंत्रज्ञान विकसित करा, असे मार्गदर्शन नोबेल पारितोषिक विजेते डंकन हॅल्डेन यांनी केले.
या वर्षी पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३८१ पीएचडी, २७ दुहेरी पदवी (एमटेक / एमफिल + पीएचडी) आणि ३५ दुहेरी पदवी (एमएस्सी +पीएचडी) विद्यार्थी आहेत. यापैकी ३९ संशोधक विद्यार्थ्यांची २०१८-२० वर्षासाठी पीएच.डी. संशोधनात सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय ३३ संयुक्त पीएच.डी. पदव्या मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने प्रदान करण्यात आल्या, कुलगुरू आणि मोनाश विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांनी हे पुरस्कार प्रदान केले. या वर्षी ३ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग विभागाच्या बी.टेक. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी साहिल शाह याला राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले.

पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेत असतात. आयआयटी मुंबईतून ६२ वर्षांमध्ये ५९ हजार ९०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे. आयआयटी मुंबईकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी यंदा ३१५ विद्यार्थ्यांना संधी दिली असून, त्यांच्यासाठी ४.४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
- सुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई

आयआयटी पदवीदान दृष्टिक्षेप
पीएच.डी. - ३८१, एमएस - ११, एमएस्सी-एमटेक - ६, एमटेक - ६२१, मास्टर इन डिझाइन - ६४, एमफील - २०, मास्टर इन मॅनेजमेंट - ११०, दोन वर्षे एमएस्सी - २२५, इंटिग्रेटेड एमएस्सी - २, ड्युएल डिग्री - ३४२, इंटर डिसिप्लीनरी ड्युएल डिग्री - १०, बीएस आणि एमएस्सी - ६, बीएस - १६, बॅचलर इन डिझाइन - १५, पीजीडीआयआयटी - १६

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचा विद्यार्थी शाश्वत शुक्ला याला 'इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल ' (२०१८-१९) तर सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी प्रकाश सिंह बदल याला डॉ . शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. बी.टेक. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी साहिल शाह याला राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले.

Web Title: Congratulations ...! IIT's virtual ceremony; Medals awarded to students using technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.