लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाटककार, दिग्दर्शक, कलाकार आणि निर्माता म्हणून प्रा. मधुकर तोरडमल यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदराचे स्थान आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला याचा मला मनस्वी आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ रंगकर्मी जनार्दन लवंगारे यांनी 'मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार' स्वीकारल्यावर 'लोकमत'शी बोलताना दिली.
ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या कुटुंबीयांतर्फे दिला जाणारा 'मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार' यंदा जनार्दन लवंगारे यांना प्रदान करण्यात आला.
मधुकर तोरडमल यांच्या ८७व्या जयंती दिनी आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात, रंगकर्मी प्रमोद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी रंगकर्मी राजन पाटील, मोहन साटम, डॉ. अपर्णा प्रभू यांनी मधुकर तोरडमल यांच्या नाटकातील स्वगत व प्रवेश सादर केले. पुढील वर्षी मधुकर तोरडमल यांची जयंती आणि पुरस्कार सोहळा नगर येथे आयोजित करण्यात येईल, असे सतीश लोटगे यांनी यावेळी स्पष्ट केले, तर ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी सदर पुरस्कार निधीसाठी अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन केले.
चौकट :
आठवणीतली 'लग्नाची बेडी'
'सुयोग'च्या सुधीर भटांमुळे मला प्रा. मधुकर तोरडमल यांच्यासोबत 'लग्नाची बेडी' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यात मामा तोरडमल यांनी 'गोकर्ण'; तर मी 'अवधूत' या भूमिका रंगविल्या होत्या. संजय मोने, प्रशांत दामले, भावनाबाई आणि अनंत जोग अशी त्यात स्टारकास्ट होती. त्या नाटकाचे २०० प्रयोग केले आणि इथेच मला मामांच्या कलाजीवनाचा परिचय झाला.
- जनार्दन लवंगारे, ज्येष्ठ रंगकर्मी
सपत्नीक पुरस्कार स्वीकारताना जनार्दन लवंगारे