Join us

अभिमानास्पद! अशी व्यवस्था असणारे महाराष्ट्र पहिले राज्य

By admin | Published: November 03, 2016 5:50 PM

प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 3 -  नेहमीच प्रगतीशील राहिलेल्या महाराष्ट्राने सायबर सुरक्षेच्याबाबतीतही एक पाऊल पुढे टाकले आहे.  प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले उचलली होती. मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सायबर गुन्हेगारी 142.1 टक्क्यांनी वाढली होती. मात्र आता सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे, असे गृहमंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
जिल्हा स्तरावर सायबर लॅब उभारल्यानंतर आता पोलीस आयुक्तालय आणि पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात सायबर लॅब उभारण्याचे प्रस्तावित आहे. नुकतीच दोन वर्षे पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस सरकार याबाबत सूचना जारी करण्याची शक्यता असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. स्वातंत्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावरील 34 सायबर लॅबचे उद्धाटन केले होते. 
(खुशखबर! सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ) 
दरम्यान, राज्यात 51 सायबर लॅबचे जाळे उभारण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. त्यातील 34 लॅब जिल्हा स्तरावर, सात लॅब पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात, नऊ लॅब पोलीस आयुक्तालयांमध्ये आणि एक लॅब राज्य पोलीस मुख्यालयात असणार आहे, अशी माहिती वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.