मराठमोळ्या श्रीकांत दातार यांना अभिनंदन पत्र, राज ठाकरेंनी व्यक्त केली 'मनसे' इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:37 PM2020-10-10T14:37:52+5:302020-10-10T14:38:53+5:30
जग औद्योगीक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी मराठी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा
मुंबई - अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत दातार हे भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरियाची जागा घेतील. 1 जानेवारी रोजी दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. दातार यांच्या नियुक्तीने जगाच्या तमाम मराठीजनांना आणि मला अत्यानंद झाला असून ही अभिमानाची बाब असल्याचं राज यांनी म्हटलंय. तसेच, मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो, मनापासून आपले अभिनंदन, असेही राज यांनी म्हटलंय. देशातील असंख्य मराठी तरुण परदेशात, विशेषत: हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी धडपडत आहेत. त्यावेळी, या विद्यापीठाचे प्रमुख मराठी माणूस असणं, याशिवाय अभिमानाची बाब दुसरी काय असणार..
जग औद्योगीक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी मराठी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा, असे राज यांनी ट्विटवरुन लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
#श्रीकांतदातार#हार्वर्डबिझनेसस्कुल#मराठीमाणूस#NewDeanofHarvard#HarvardBusinessSchool#ShrikantDatar#MarathiPridepic.twitter.com/a4hjStGmhx
— Raj Thackeray (@RajThackeray) October 10, 2020
हार्वर्ड बिझनेस स्कूल तब्बल 112 वर्षे जुने असून श्रीकांत हे या संस्थेचे सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत. तर, हार्वर्ड बिझनेस स्कुलचे ते 11 वे डीन असणार आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी याबाबत माहिती दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन श्रीकांत यांचा फोटो शेअर करत एक पत्रही लिहिलं आहे. आपल्या निवडीने मला व तमाम मराठीजनांना अत्यानंद झाल्याचे राज यांनी म्हटले.
1 जानेवारी 2021 पासून स्वीकारणार पदभार
"आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे पुढचे डीन असणार आहे" अशी माहिती अध्यक्ष लॅरी बॅकोव यांनी दिली आहे. 1 जानेवारी 2021 पासून श्रीकांत दातार आपला पदभार स्वीकारतील. तसेच "श्रीकांत दातार एक नाविन्यपूर्ण शिक्षक, एक प्रतिष्ठित विद्वान आणि एक अनुभवी प्राध्यापक आहेत" असं देखील लॅरी बॅकोव यांनी म्हटलं आहे.
दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे असणार अकरावे डीन
दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अकरावे डीन असणार आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. या महामारीदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याचा सामना करण्यासाठी दातार यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. 1973 मध्ये श्रीकांत दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं. चार्टर्ड अकाऊंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला. त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली.