गुन्ह्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्फोटके कारप्रकरणी एनआयएने वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली असली, तरी त्यांच्यावर काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. हे कृत्य करण्यामागील नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे त्याचा छडा लावण्यासाठी वाझे यांच्याकडे कसून चौकशी करण्याबरोबरच त्यांचे मोबाइल सीडीआर तपासण्यात येतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर आढळलेल्या स्फोटके कार प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सुमारे आठ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर, एसीपी नितीन अलकनुरे यांना नेमण्यात आले. मात्र, तरीही सर्व सूत्रे वाझे हेच हाताळत होते. ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर सर्व तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला. हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांच्याकडे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यांनी दिलेल्या जबाबामध्ये विसंगती आणि काही प्रश्नांची असमाधानकारक उत्तरे दिल्याने एटीएसने त्यांच्यावर आरोपी म्हणून कारवाई करण्याचा दृष्टीने अहवाल बनविला. त्याला अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळण्यापूर्वीच एनआयएने त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशीनंतर अटक केली.
अंबानी यांच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील नेमका उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास केला जात आहे, त्याचबरोबर केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त असल्याचा अधिकाऱ्यांना दाट संशय आहे. त्याबाबत ते कोणाच्या संपर्कात होते, कोणाशी चर्चा करत होते, याची माहिती घेतली जात आहे, त्यासाठी त्यांच्या सर्व मोबाइलचे सीडीआर तपासले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे यांचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एनआयएच्या तपासातून आणखी कोणत्या धक्कादायक बाबी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------
हत्येचाही गुन्हा दाखल करणार
सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत- त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सूत्रांनी सांगितले.
------------------
गुन्ह्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर
सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या आधिपत्त्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.