मुंबई : पूनम महाजन आपल्या पतीच्या कंपनीकडे थकबाकी असलेल्या ११.४० कोटी रुपयांच्या कर्जाकरिता जामीनदार म्हणून थकबाकीदार आहेत. ही बाब त्यांनी प्रतिज्ञापत्रात दडविली. त्यांच्यावर बँकेने दावा दाखल केलेला आहे. महाजन पती-पत्नीवर इंडियन ओव्हरसीज बँक व पंजाब नॅशनल बँक यांचे एकूण ६७.६५ कोटी रुपयांच्या वसुलीचे दावे दाखल आहेत. ही बाब जनतेपासून दडविण्याचे कृत्य त्यांनी केले आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र देणे, हा लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या १२३ कलमानुसार गुन्हा आहे. म्हणून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
पूनम महाजन यांची मालमत्ता ही २००९ रोजी १२ कोटी रुपये होती, २०१८ला १०८ कोटी झाली, तर २०१९ रोजी फक्त २ कोटी राहिली आहे. यातूनच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे, असे सांगून सावंत म्हणाले, बँकांनी यांच्या कर्जाचा किती भाग ‘राइटऑफ’ (माफ) केला आहे, हेही शोधण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सिबील स्कोअर ६०० असून, वैयक्तिक कर्जाचा स्कोअर ५७० आहे. या आकडेवारीनुसार त्यांची पत पूर्णपणे संपुष्टात आली असून, त्यांना एक पैशाचेही कर्ज मिळू शकत नाही, असा दावाही सावंत यांनी केला आहे.
फिनिक्स ऑटो प्राइवेट लिमिटेड, या कंपनीसंदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली नाही. या कंपनीमध्ये पूनम महाजन यांच्या पतीची ५१ टक्के भागीदारी आहे. कॉर्पोरेट गॅरंटीवर पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँक आॅफ इंडिया यांनी १९६.७४ कोटी रुपयांचे आद्या मोटार कार कंपनी प्रा. लिमिटेड (पूनम महाजन व त्यांच्या पतीची कंपनी) कर्ज दिले होते. या दोन्ही कंपन्या फिनिक्स व आद्या सिस्टर कंसर्न कंपन्या आहेत. पूनम महाजन ३० मार्च, २०११ ते ७ डिसेंबर, २०१५ पर्यंत या दोन्ही कंपनीच्या संचालक होत्या. आद्या रिअलटर्स अँड इस्टेट प्रा. लि. या कंपनीचा २०१९ व यापूर्वीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुठेच उल्लेख नाही. आद्या रिअलटर्स अँड इस्टेट प्रा. लि. या कंपनीतही पूनम महाजन यांच्या पतीची ५१ टक्के भागीदारी असल्याचे सावंत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सुमेध गायकवाड व उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झिया उर रेहमान वाहिदी उपस्थित होते.