Join us

महाविकास आघाडीत शिवसेनाविरुद्ध काँग्रेस; आमदार झिशान सिद्दीकीचा मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 3:01 PM

मंत्र्यांनी स्वत:चं कार्यालय, घर तपासावं कदाचित इतर हजारो लोकांच्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच सापडतील असं काँग्रेस आमदारानं म्हटलं आहे.

मुंबई – महाविकास आघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसविरुद्ध शिवसेना(Shivsena-Congress) असा सामना पाहायला मिळत आहे. सरकारमध्ये काँग्रेसचे २५ आमदार नाराज असून त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवल्याची घटना अलीकडेच घडली होती. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते असं विधान केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता पुन्हा एकदा काँग्रेस आमदाराने स्वत:च्या सरकारमधील मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्यावर निशाणा साधल्याने महाविकास आघाडीत वाद अशी चर्चा सुरू झाली आहे.

वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी(Zeeshan Siddique) यांनी मंत्री अनिल परबांना खोचक सल्ला दिला आहे. झिशान सिद्दीकी म्हणाले की, वांद्रे पूर्व मतदारसंघातील गोळीबार एसआरए योजनेमुळे अनेक लोकं शिवालीक बिल्डर्समुळे नाराज आहेत. वर्षोनुवर्षे हक्काचं घर मिळवण्यासाठी लोकं धडपड करत आहेत. विधानसभेतही मी हा प्रश्न विचारला. दुर्दैवाने आजपर्यंत हे उत्तर मिळालं नाही. शिवालीक बिल्डर्सवर कारवाई न करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? असा सवाल करत नुकतेच मंत्री अनिल परब स्वत:च्या हाताने २०-२५ लोकांना चाव्या वाटत आहे. मग त्या हजारो लोकांचे काय ज्यांना अद्याप घरं मिळालं नाही. जर विकासकाला चाव्या वाटायच्या असतील तर मंत्र्यांच्या हातातून वाटल्या जातात. आम्ही एसआरएसोबत बैठक घेतो तेव्हा विकासक येत नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच मंत्र्यांनी स्वत:चं कार्यालय, घर तपासावं कदाचित इतर हजारो लोकांच्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच सापडतील.  तुमच्या मित्राला विचारा. शिवालीक बिल्डर्ससोबत तुमचे घनिष्ट संबंध आहेत. मग इतकी वर्ष लोकांवर अन्याय का होत आहे याचा जाब विचारा. राजकारण बंद करा, लोकांच्या हिताचे निर्णय घ्या. लोकांसाठी काहीतरी करा. निवडणूक आल्यानंतर लोकांना भाड्याचे पैसे, चाव्या देऊन आश्वासनं देऊ नका असा खोचक सल्ला झिशान सिद्दीकी यांनी मंत्री अनिल परब यांना दिला आहे. काँग्रेस आमदारानं जाहीररित्या मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केल्याने महाविकास आघाडीत काही आलबेल नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.    

टॅग्स :महाविकास आघाडीशिवसेनाकाँग्रेसअनिल परब