मुख्यालय प्रवेशासाठी काँग्रेसही आक्रमक
By admin | Published: May 25, 2014 03:40 AM2014-05-25T03:40:05+5:302014-05-25T03:40:05+5:30
महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सामान्य नागरिकांना दोन तास प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकमतने आवाज उठविल्यानंतर या निर्णयास सर्वस्तरातून विरोध होत आहे
नवी मुंबई : महापालिकेच्या नवीन मुख्यालयामध्ये सामान्य नागरिकांना दोन तास प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकमतने आवाज उठविल्यानंतर या निर्णयास सर्वस्तरातून विरोध होत आहे. काँगे्रसनेही आयुक्तांना पत्र देवून प्रवेश खुला करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे नवीन मुख्यालय अनेक कारणांनी वादग्रस्त होवू लागले आहे. शहरातील लँडमार्क म्हणून ओळख निर्माण केलेली ही वास्तू पाहण्यासाठी शहरातील नागरिक आवर्जून येथे येत आहेत. पामबिच रोडवरून जाणारे नागरिकही मुख्यालयाला भेट देत आहेत. कामानिमित्त अनेक नागरिक येथे येत आहेत. परंतू महापालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांना दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांना त्रास होवू लागला आहे. गत आठवड्यात सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावर अडविल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकमतने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी भरत जाधव यांनी आयुक्त व महापौरांना पत्र देवून सामान्य नागरिकांना कार्यालयीन वेळेत प्रवेश खुला करण्याची मागणी केली आहे. काँगे्रसनेही आता सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजय यादव यांनी आयुक्तांना पत्र देवून नागरिकांना कार्यालयीन वेळेत प्रवेश खुला असावा अशी मागणी केली आहे. बेलापूर व सिवूड रेल्वे स्टेशनपासून एनएमएमटी बसेसची सुविधा करावी अशी मागणी केली आहे. सामान्यांना प्रवेश खुला केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.