Join us

सरकार टिकविण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही - नसीम खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आणि मुंबई अध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या पदभार ग्रहणाचा कार्यक्रम सोमवारी मुंबईत झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आणि मुंबई अध्यक्ष, कार्याध्यक्षांच्या पदभार ग्रहणाचा कार्यक्रम सोमवारी मुंबईत झाला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला मिळत असलेली वागणूक आणि शिवसेनेकडून काँग्रेस नेतृत्वाबाबत होत असलेल्या विधानांवर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. माजी मंत्री आणि मुंबई प्रचार समितीचे अध्यक्ष नसीम खान यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आमच्या पक्षातील लोकांना आघाडीतील इतर पक्षात घेतले जाते. यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने असे वागू नये. काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल, तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकविण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे नसीम खान म्हणाले.

काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाही. अमीन पटेल, झिशान सिद्दीकी या आमदारांना सरकारकडून निधी मिळत नाही. हे प्रकार मुद्दाम घडत आहेत का, असा प्रश्न करतानाच मुंबईत काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे, असेही नसीम खान यांनी म्हटले. संपुआ अध्यक्षाविषयी बोलण्याचा अधिकार सामना आणि शिवसेनेला कोणी दिला? जो पक्ष यूपीएचा भाग नाही, त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. सोनिया गांधी याच यूपीएच्या अध्यक्ष राहतील, तसेच राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखविणाऱ्यांचे बोट तोडले जाईल, असा इशाराही नसीम खान यांनी दिला.

नसीम खान यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेची दखल घेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार असल्याचे सांगितले. नसीम खान यांना सांगतो, काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू, असे सांगितले, तर अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपला थांबविण्यासाठीच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावरच चालेल. सोनिया-राहुल गांधी यांच्या विचार आणि भूमिकेवर सरकार चालेल, असे चव्हाण म्हणाले. यावेळी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा देत, ‘भाजपचा सामाना करायचा आहे, हे विसरू नका. अन्यथा, दोन हात - सामना आम्हीही करू,’ असे चव्हाण म्हणाले.

* राज्यातले सरकार टिकवायची सर्वांची जबाबदारी - नवाब मलिक

‘काही जणांना जास्त बोलले की आपले महत्त्व वाढेल असे वाटते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी नसीम खान यांना टोला लगावला. सरकार चालविणे सर्वांची जबाबदारी आहे. पक्षात आपली ताकद आहे, असा आव आणत आपले महत्त्व वाढविण्यासाठी काही वक्तव्ये होत आहेत. आगामी कोणतीही निवडणूक असेल, ती महाविकास आघाडीने एकत्रित लढली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे मलिक म्हणाले.