मुंबईः विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेवरून पुन्हा एकदा चढाओढ पाहायला मिळतेय. भाजपाला 105 जागा मिळाल्या असून, शिवसेनेचा 56 जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर शिवसेनेनं अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील वाटा वाढवण्यासाठी भाजपावर दबाव वाढवला आहे. त्यातच काँग्रेसनंही शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेनं प्रस्ताव दिल्यास काँग्रेस पाठिंबा देण्याचा विचार करेल, असे सूतोवाच केले आहेत.आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहोत, पण जर शिवसेनासोबत सत्ता स्थापनेसाठी पर्यायावर चर्चा करायची असेल, तर शिवसेना आमच्याकडे यायलाच हवी, त्यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपाच्या मागणीवरून ते म्हणाले, चेंडू आता भाजपाच्या कोर्टात आहे. आता शिवसेनेनं ठरवायचं आहे की शिवसेनेला पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपद हवं की भाजपाबरोबर अडीच अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं आहे. जर शिवसेनेनं आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला, तर आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी यासंदर्भात चर्चा करू, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:54 PM