Join us

धनूभाऊ, पंकजाताईचं बरं चाललंय... आम्हीच विनाकारण विचार करतो; अमित देशमुखांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 6:03 AM

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे बुधवारी प्रभादेवी येथे उद्घाटन झाले. यावेळी राजकीय टोलेबाजी रंगली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेजारच्या बीड जिल्ह्यात जायचे तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना राग येईल का, असा प्रश्न पडतो. मात्र, इथे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र बसून छान बोलत आहेत. याचा अर्थ तुमचं बरं चाललंय. आम्हीच विनाकारण विचार करत राहतो, असे म्हणत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जोरदार फटकेबाजी केली. तुमच्या घरोब्यात आता आम्हालाही सामील करून घ्या, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना चष्मा लागला, आपल्याला अद्याप नाही. मुंडे-महाजनांच्या लेन्समधून पाहत मोठे झालेले व शरद पवार यांच्या लेन्समधून बघणारे माझे बंधू, असा उल्लेख करून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या लेन्सचा संदर्भ देत राजकीय गुगली टाकली. ती परतवून लावताना महाविकास आघाडीच्या लेन्समधून तुम्ही आता बघितले पाहिजे, असे आपल्याला आताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याचा फटका धनंजय मुंडे यांनी लगावला, आणि सभागृहात हंशा पिकला. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मला बोलायचे नाही, असे सांगत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत चांगल्या कामासाठी एका व्यासपीठावर जमणारे नेते आणि त्यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. इथे एका व्यासपीठावर जमलेले सर्वपक्षीय नेते त्याचे प्रतीक आहेत, अशा शब्दात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजकीय भाष्य केले. राजकारणात सर्व काही दृष्टिपथात असलेले शरद पवार आहेत हा योगायोग पुन्हा होणे नाही. तसेच, दृष्टी देणाऱ्या कार्यक्रमाला वेगळाच दृष्टिकोनही लाभल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. तेव्हाही जोरदार टाळ्या पडल्या.

डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे बुधवारी प्रभादेवी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खा. प्रीतम मुंडे, मनसेचे बाळा नांदगावकर, मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

बहीण भावांनी फीत कापली..!

आमच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला माहिती आहे असे सांगणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या बहीण भावांनी रघुनाथ नेत्रालयाची फीत कापली. त्यावेळी बहीण खा. प्रीतम मुंडे ही उपस्थित होत्या.

या दवाखान्यात ५० टक्के रुग्णांना मोफत उपचार केले जातील. ज्या ५० टक्के लोकांकडून पैसे घेतले जातील तेदेखील उपचारांवर आणि इथल्या व्यवस्थेवर खर्च केले जातील अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

शरद पवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

डॉ. लहाने यांनी लाखो शस्त्रक्रिया केल्या, कित्येकांना दृष्टी दिली, या साऱ्या गोष्टींचा आलेख सर्वश्रुत आहे. एखाद्या अंध व्यक्तीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि तो पहिल्यांदा जग पाहतो, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद डॉ. लहानेंनी आपल्या कष्टांनी निर्माण केला. त्यांनी कधीही पैशांची अपेक्षा केली नाही. धनसंपत्तीचा विचार न करता एखाद्याला नेत्रदृष्टीचे धन प्राप्त करून देणे, डॉ. लहानेंचे ध्येय होते, अशा शब्दात डॉ. लहाने यांचे शरद पवार यांनी कौतुक केले.

खसखस पिकली

पंकजाताई मला लहानपणापासून ओळखतात. चष्म्याचा, लेन्सचा नंबर वाढला की तो बदलावा लागतो. तेवढ्यासंदर्भात मी बोललो. धनंजय मुंडे बाकीचे जे बोलले ते नाही, असे सांगताना गैरसमज नको व्हायला म्हणून खुलासा करतोय असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच सभागृहात खसखस पिकली.

टॅग्स :धनंजय मुंडेपंकजा मुंडेअमित देशमुखमुंबई