Mohit Kamboj Aslam Shaikh Video मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काँग्रेसचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेले अस्लम शेख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. अस्लम शेख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेट ही अत्यंत गुप्त पद्धतीची असल्याची माहिती देण्यात आली. या भेटीमागचे कारण नक्की काय हे स्पष्ट झालेले नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, अस्लम शेख सागर बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर ते भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या कारमधून दुसरीकडे निघून गेल्याचे दिसले. त्यामुळे तर या भेटीमागे नक्की काय शिजतंय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, मोहित कंबोज यांनी प्रसारमाध्यमांशी अस्लम शेख यांच्यासोबतच्या भेटीबाबत माहिती दिली. आज कंबोज यांचा वाढदिवस असल्याने आम्ही इथे भेटलो. अस्लम शेख हे माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी भेटले, असं उत्तर मोहित कंबोज यांनी दिलं. पण संजय राऊत यांच्या ईडी चौकशी व कारवाईबाबत मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सावध प्रतिक्रिया दिली. "तपास यंत्रणा आपलं काम करत असतात. तुम्ही ६५० लोकांची घरे हिरावून घेतली. तुम्ही १०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार बळाचा वापर करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केलात. संजय राऊतांचे राजकारण नेहमीच खालच्या दर्जाचे होते. दररोज सकाळी उठून सलीम-जावेद सारखे ते स्वत:ची स्टोरी घेऊन यायचे. अखेर आज सलीम जावेदचे मिलन झाले. पण या सर्वांशी माझा काहीही संबंध नाही", अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अस्लम शेख फडणवीसांच्या भेटीला जाण्यामागे नक्की काय आहे चर्चा?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर रविवारी संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावरही देखील गंभीर आरोप केले होते. अस्लम शेख यांनी २०० कोटींच्या घोटाळा करून काही अनधिकृत गोष्टी केल्या असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या संदर्भात अस्लम शेख हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर गेले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याची दिसली. परंतु, या सर्व गोष्टींबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.