Join us  

Dasara Melava: “मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 6:04 AM

Dasara Melava: BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली RSS, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा लोटांगण सोहळा केल्याची घणाघाती टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, यातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावरून महाविकास आघाडीतून टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही, या शब्दांत काँग्रेसकडून एकनाथ शिंदेवर निशाणा साधण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्याच्या भाषणाची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. उद्धव ठाकरेंचे शिवाजी पार्क येथून दसरा मेळाव्याचे भाषण संपत आल्यानंतर एकनाथ शिंदे हे बीकेसी मैदानावर भाषणासाठी उभे राहिले. एकनाथ शिंदे यांनी जवळपास दीड तास दसरा मेळाव्याचे भाषण केले. मात्र, हे भाषण अपेक्षेइतके रंगले नाही, अशी टीका नेटकरी आणि विरोधकांकडून केली जात आहे. यातच काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही

अतुल लोंढे ट्विटमध्ये म्हणतात की, BKC मध्ये प्रचंड मोठी गर्दी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा चांगले आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! पैसा खर्चून गर्दी आणली, भाषणही लिहून आणले पण वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही हेच BKC मध्ये दिसले. BKC तील दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री RSS चे प्रवक्ते बनून RSS ने देश कसा घडवला याचे ज्ञान वाटले. ED च्या भीतीपायी तुम्ही गद्दारी केली त्याबद्दल आम्ही काही म्हणणार नाही पण काहीही बोलून मुख्यमंत्रीपदाची गरिमा घालवू नका. BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा लोटांगण सोहळा असल्याची घणाघाती टीका अतुल लोंढे यांनी केली. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून जात असल्याचा प्रकार बीकेसी मैदानावर झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाचे मुंबईबाहेरील कार्यकर्ते प्रवासात होते. अनेकजण बुधवारी दुपारी मैदानात दाखल झाले आहे. मात्र, सभा सुरु होण्यासाठी रात्रीचे साडेआठ वाजले. त्यामुळे अनेक लोक एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना अर्ध्यातून निघून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेकाँग्रेसमहाविकास आघाडी