Balasaheb Thorat Reaction On Ashok Chavan Joins BJP: काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. तर पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. भाजपाच्या राजकारणाला जनता कंटाळली असून जनताच यांची डोकी फोडेल. त्यांच्या जाण्याने आभाळ कोसळले नाही, नेते गेले म्हणजे कार्यकर्ते जात नसतात, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
अशोक चव्हाण दबावामुळे, स्वार्थासाठी भाजपात गेले
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला सुरु होता. अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, केंद्रात विविध खात्याचे मंत्री अशी संधी दिली. असे असताना ते भाजपात गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपात गेले असावेत. परंतु जनता जागरूक आहे. भाजपाला धडा शिकवेल. महाविकास आघाडी मजबूत असून, विधानसभेला विजय मिळून मविआचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली पण भाजपात त्यांना ती संधी मिळणार नाही. आता त्यांना मागील रांगेत बसावे लागेल. भाजपा अनेक प्रयत्न करूनही महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकत नाही, हे त्यांच्याच सर्वेत दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची अडचण झाली आहे. त्यामुळे ते त्यांची व पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. १५ तारखेला काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आहे त्यानंतर १६ व १७ तारखेला लोणावळ्यात शिबीर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्षच जिंकेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.