Join us

“मणिपूर घटनेवर भाजपच्या मनात गुन्हेगारीची भावना, विधानसभेत पाच मिनिटेही बोलू दिले नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 7:32 PM

Manipur Violence: मणिपूर घटनेचे पडसात महाराष्ट्राच्या विधिमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले.

Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. दुसरीकडे विधानसभेत मणिपूरच्या घटनेवर बोलू न दिल्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब खोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. 

मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. परंतु ते संसदेबाहेर येऊन बोलले. ते संसदेत याविषयी काहीच बोलले नाहीत. मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिले तर ही घटना खूप गंभीर आहे. या घटनेमुळे जगभर आपल्या देशाची छी-तू होत आहे. या विषयावर आमच्या महिला आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही. पाच मिनिटंसुद्धा त्यांनी दिली नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाच्या मनात या घटनेप्रकरणी आपण गुन्हेगार असल्याची भावना आहे. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. म्हणून महिला आमदारांना विधानसभेत त्यांनी बोलू दिले नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.

काही लोक ही घटना लोकांपासून लपवून ठेवू पाहत होते

मणिपूरमध्ये घडलेली घटना ही केवळ मणिपूरची आहे असे म्हणता येणार नाही. अडीच महिने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. कोणतीही कारवाई केली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हालचाल सुरू झाली. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे. काही लोक ही घटना लोकांपासून लपवून ठेवू पाहत होते, अशी टीका थोरात यांनी केली. तसेच मणिपूरमधील घटनेवर बोलू न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आमदार सभागृहाबाहेर पडले. 

दरम्यान, मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला. त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षातील इतर आमदारांनीही सभात्याग केला.

 

टॅग्स :मणिपूर हिंसाचारबाळासाहेब थोरातमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३