Maharashtra Monsoon Session 2023:पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेणच्या रूग्णालयात ते उपलब्यध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धारेवर धरले.
याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेण मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी राज्य असल्याची जाहिरात करतो पण सर्पदंशावरील साधे इंजेक्शन, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध ठेवण्याचे सक्तीचे आदेश असतात. पण सरकारच्या दुर्लक्षामुळे या रूग्णालयांना मिळालेला हा कोटा काळ्या बाजारात विक्री केला जातो आणि सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
सरकारी अनास्था, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे मृत्यू
या दुर्देवी घटनेतील मुलगी सारा रमेश ठाकूर ही केवळ १२ वर्षाची होती, सातवीच्या वर्गात शिकत होती. सर्पदंशानंतर तिला तत्काळ पेण उप जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचाराची साधने नसल्याचे कारण देत तिच्यावर उपचार न करता परत पाठवले. वास्तविक पेण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन या मुलीचा जीव वाचविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी उपचारास नकार दिला ही अक्षम्य चूक आहे. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेले तिथून तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देऊन उपचार नाकारला, इतकी भयंकर व लाजिरवाणी घटना घडलेली आहे. तिचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही तर सरकारी अनास्थेमुळे, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे झाला आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
दरम्यान, साराच्या शाळेतील मुले, शिक्षक व ग्रामस्थांनी तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली, पुन्हा ती सातवीच्या वर्गात दिसणार नाही, याची खंत व्यक्त केली. पण ढिम्म शासनावर त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. या निष्पाप कोवळ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणा-या बेजबाबदार व बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी थोरात यांनी केली.