Maha Vikas Aghadi: “नवाब मलिकांचा राजीनामा मागण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:15 PM2022-02-24T17:15:45+5:302022-02-24T17:16:52+5:30
Maha Vikas Aghadi: ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा पलटवार काँग्रेसने केली आहे.
मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असे विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांच्या अटेकच्या निषेधार्ह व केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीने मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, २० वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाशी काहीतरी करुन धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करुन नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधातील लढ्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते काय? याचे आधी उत्तर द्यावे. ज्यांच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा पलटावर बाळासाहेब थोरात यांनी केला.
चुकीचा पायंडा पाडला जातोय
सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरु झाले आहे. मंत्र्याला अशापद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जातोय, असे अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, या आंदोलनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार आदी उपस्थित होते. केंद्र सरकार, ईडी व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.